देसवंडी येथे शेड बांधकामावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी; आठ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 01:48 PM2020-08-07T13:48:49+5:302020-08-07T13:49:00+5:30
पत्र्याचे शेड बांधण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे गुरुवारी (६ आॅगस्ट) घडली. या हाणामारीत दोन्ही गटातील आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील चार जणांना नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
राहुरी : पत्र्याचे शेड बांधण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे गुरुवारी (६ आॅगस्ट) घडली. या हाणामारीत दोन्ही गटातील आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील चार जणांना नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे शिरसाठ यांचे पत्र्याचे शेड बांधण्याचे काम सुरू होते. यावेळी तेथे कोकाटे गटातील काही जण आले. शेड बांधण्याच्या कारणावरून शिरसाठ व कोकाटे गटात सुरवातीला बाचाबाची झाली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच यांनी घटनास्थळी जाऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. वाद मिटविणारे निघून गेल्यावर शिरसाठ व कोकाटे या दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत कुºहाड, गज, लाकडी दांडके व तलवार या हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. यावेळी शिरसाठ गटातील प्रकाश भाऊसाहेब शिरसाठ, ज्ञानेश्वर भाऊसाहेब शिरसाठ, दत्तात्रय भाऊसाहेब शिरसाठ, सुरेश भाऊसाहेब शिरसाठ, अनिकेत दत्तात्रय शिरसाठ, भाऊसाहेब जगन्नाथ शिरसाठ तर कोकाटे गटातील निलेश राजेंद्र कोकाटे, दीपक अर्जून कोकाटे असे एकूण आठ जण जखमी झाले आहेत. राहुरी येथील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी वैभव जासूद यांनी जखमींवर उपचार केले.
यापैकी प्रकाश भाऊसाहेब शिरसाठ, ज्ञानेश्वर भाऊसाहेब शिरसाठ, दत्तात्रय भाऊसाहेब शिरसाठ व सुरेश भाऊसाहेब शिरसाठ हे चार जण गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने त्यांना अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. जखमी झालेले सर्व जण देसवंडी येथील रहिवाशी असून शेजारी शेजारी रहात आहेत. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशीरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.