अकोले तालुक्यामधील नवलेवाडीतील दोन हॉटेलचे दारू परवाने रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 07:15 PM2018-06-10T19:15:32+5:302018-06-10T19:15:47+5:30
तालुक्यातील नवलेवाडी हद्दीतील हॉटेल पथिक व हॉटेल विजय या दोन दारू दुकानांचे दारू परवाने रद्द करण्यात आले आहेत. तालुका दारुबंदी आंदोलनाने केलेल्या तक्रारींनुसार जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले आहे.
अकोले : तालुक्यातील नवलेवाडी हद्दीतील हॉटेल पथिक व हॉटेल विजय या दोन दारू दुकानांचे दारू परवाने रद्द करण्यात आले आहेत. तालुका दारुबंदी आंदोलनाने केलेल्या तक्रारींनुसार जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले आहे.
१ एप्रिल २०१७ ला बंद केलेली दारु दुकाने पुन्हा सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पण ते आदेश देताना फक्त नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांच्या हद्दीतील दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली. हॉटेल पथिक व हॉटेल विजय हे नवलेवाडी या ग्रामपंचायत हद्दीत असल्याने ते सुरू होत नसूनही उत्पादन शुल्क अधिकारी यांनी अधिकाराचा गैरवापर करीत ही दोन्ही दुकाने पुन्हा सुरू केली. याबाबत आॅक्टोबर २०१७ मध्ये दारुबंदी आंदोलनाने उत्पादन शुल्क अधीक्षक व संगमनेर उत्पादन शुल्क अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. संगमनेर येथील अधिकारी यांनी जवळपास सात महिने वेळकाढूपणा केला. नकाशा मागविणे, त्याबाबतचे स्पष्टीकरण मागविणे असे अनेक कागदपत्रे मागवून शेवटी काहीच निर्णय घेतला नाही. दारूबंदी कार्यालयाने दोन्ही अधिकाऱ्यांना सतत फोन विनंती करूनही दोन्ही अधिकाºयांनी ७ महिन्यात अकोल्यात तक्रारदारांची भेट घेतली नाही. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्पादन शुल्क आयुक्त यांचेकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी आदेश दिल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात योग्य अंतर व नियम पूर्तता करूनच परवाना सुरू करणे आवश्यक होते, अशी स्पष्ट नाराजी जिल्हाधिकाºयांनी नोंदवून पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ बंद करण्यात येत आहे असे आदेश दिले आहेत.
उत्पादन शुल्क अधिकारी जबाबदार
मुख्यमंत्री, आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत दारुबंदी आंदोलनाचे हेरंब कुलकर्णी, संतोष मुतडक, निलेश तळेकर, संदीप दराडे, सुनील उगले यांनी पाठपुरावा केला. त्याचबरोबर संगमनेर येथील उत्पादन शुल्क अधिकारी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान करून चुकीच्या पद्धतीने दुकान सुरू केल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी आंदोलनाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.