ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार

By Admin | Published: June 27, 2016 12:54 AM2016-06-27T00:54:42+5:302016-06-27T01:01:12+5:30

संगमनेर : मालवाहू ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होवून अपघातात दोन परप्रांतीय जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात घडली.

Two killed in a truck-bike accident | ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार

ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार


संगमनेर : मालवाहू ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होवून अपघातात दोन परप्रांतीय जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात घडली. याप्रकरणी घारगाव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले.
रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राम आशिषचंद्रिका यादव (वय ४४) व मोहंमद शबूअली (दोघे मूळ बिहार, हल्ली रा. अंबड, नाशिक) हे दोघे दुचाकीवरून (एम. एच. १५, र्ई. एम. ७६६८) नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाने आळेफाट्याहून संगमनेरच्या दिशेने येत होते. यावेळी माहुली शिवारात संगमनेहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू ट्रकची (एम. एच. १२, के. पी. ६५०२) दुचाकीला समोरून जोराची धडक बसली. यात दुचाकीवरील यादव व शबूअली हे दोघे गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाले. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला.
ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मयत हे बिहार राज्यातील असून यादव हा बांधकाम ठेकेदार तर शबूअली हा त्याच्याकडे कामाला होता. दोघेही अंबड (नाशिक) येथे वास्तव्यास होते. कामानिमित्त ते दुचाकीवरून आळेफाट्याला गेले होते. घरी परतताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी घारगाव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी पोलिसांनी संतोष पवार (रा.घोळेवाडी, ता.पाटोदा, जि.बीड) या ट्रक चालकास अटक केली.
(प्रतिनिधी)
भिंगार : नगर -जामखेड रोडवर टँकर व जीप यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत जीप चालक नितीन बाजीराव राठोड (वय २७, रा. शिवाजीनगर, नेप्ती रोड) हे जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी सकाळी घडला.
लातूरकडून नगरकडे येणारा टँकर (टीएल १६-ए ७६६३) आणि नगरकडून जामखेडच्या दिशेने जाणारी स्कार्पिओ जीप (टीएल १६, एके-१७५०) यांच्यात हॉटेल उत्सवसमोर जोरदार धडक झाली. या अपघातात जीपचालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला सारत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर रोडवर राठोड यांच्या पाहुण्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले होते. त्यांना तुळजापूर येथून आणण्यासाठी राठोड हे जीप घेवून तुळजापूरकडे निघाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली. (वार्ताहर)

Web Title: Two killed in a truck-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.