नगर तालुक्यात दोन लाख लाभार्थ्यांना मिळणार स्वस्त धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:20 AM2021-05-11T04:20:45+5:302021-05-11T04:20:45+5:30
केडगाव : अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दोन किलो तांदूळ आणि तीन किलो गहू असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा ...
केडगाव : अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दोन किलो तांदूळ आणि तीन किलो गहू असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील महिन्यात घेतला होता. नगर तालुक्यातील दोन लाख लाभार्थ्यांना आजपासून (मंगळवार) त्याचे वाटप स्वस्त धान्य दुकानातून होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करताना गरीब आणि गरजू रेशनकार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला. अनेक छोटे-मोठे व्यवसाय, कामधंदे बंद पडले. अनेक गरिबांचे रोजगार बुडाल्याने अन्नधान्याविना त्यांची उपासमार सुरू होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेशनधारकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय मागील महिन्यात घेतला होता. याची अधिकृत घोषणा होईपर्यंत एप्रिल महिन्यातील धान्य वाटप जवळपास सर्वत्र झाले होते.
आता मे महिन्याचे मोफत धान्य वाटप मंगळवारपासून स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरित केले जाणार आहे. तालुक्यात एकूण १२५ स्वस्त धान्य दुकान आहेत. यातीत अंत्योदयचे ४ हजार ७७८, तर प्राधान्य कुटुंबचे ४२ हजार ४०८ कार्डधारक आहेत. अशा एकूण २ लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारचे धान्य वाटपही लवकरच सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.
---
तालुक्यातील रेशनकार्ड स्थिती
:
एकूण स्वस्त धान्य दुकाने- १२५, रेशनकार्डधारक- अंत्योदय योजना- ४७७८, लाभार्थी- २१५६३, प्राधान्य कुटुंब योजना- ४२४०८, लाभार्थी - १, ७९, २५०. एकूण लाभार्थी - २,००,८१३.
---
हाताला काम नाही. लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडी झाली आहे. राज्य सरकारचे मोफत धान्य मिळणार आहे. आम्हा गरिबांसाठी हा मोठा आधार आहे. केंद्र सरकारचेही मोफत धान्य लवकर मिळण्याची अपेक्षा आहे.
-निवृत्ती गाडेकर,
मजूर, जेऊर