देवळाली प्रवराच्या मुख्याधिका-याने घेतली २ लाखाची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 06:59 PM2019-02-06T18:59:31+5:302019-02-06T19:00:28+5:30
देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानाभाऊ महानवर व सहाय्यक फायरमन मुकूंद मुसमाडे यांना बुधवारी (दि़६) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली़
अहमदनगर/राहुरी: देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानाभाऊ महानवर व सहाय्यक फायरमन मुकूंद मुसमाडे यांना बुधवारी (दि़६) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली़
विविध शहरात साफसफाईचे कामे करणाºया कंपनीला राहाता शहरातील साफसफाईचे काम मिळाले होते़ या कंपनीच्या माध्यमातून १ डिसेंबर २०१८ पासून कामास सुरूवात झाली होती़ ५ जानेवारी २०१९ रोजी राहाता नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी या कंपनीचे काम बंद करण्याचे आदेश दिले़ याबाबत देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब विश्वनाथ महानवार यांनी सदर कंपनीच्या संचालकास बोलावून घेतले़ माझ्याकडे जिल्हा नियोजन अधिकारीचा अतिरीक्त कार्यभार होता तेव्हा मिच प्रयत्न करून तुमची राहता येथील साफसफाई कामाबाबतची ई-निविदा मंजूर करून घेतली आहे. त्या बदल्यात बक्षिस म्हणून व मुख्याधिकारी राहता यांचेशी मध्यस्ती करून कामास असलेला स्थगिती आदेश मागे घेण्यास सांगतो. असे म्हणून या मोबदल्यात एकूण निविदा रकमेवर ६ टक्के प्रमाणे तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली. याबाबत सदर कंपनीच्या संचालकाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीच्या अनुषंगाने ३० जानेवारी रोजी लाच मागणीची पडताळणी केली असता, यातील मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी तक्रारदार यांच्याकडे ६ टक्के प्रमाणे दोन लाख रुपए लाचेची मागणी केल्याचे समोर आले़ ही लाचेची रक्कम महानवर यांनी बुधवारी देवळाली प्रवरा नगर परिषदेतील सहाय्यक फायरमन मुकूंद रामराव मुसमाडे याला स्विकारण्यास सांगितली. त्यांच्या सांगण्या प्रमाणे यातील मुकूंद मुसमाडे यांनी सदर लाचेची दोन लाख रुपये रक्कम ही राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड रोडवरील समाधान हॉटेलचे लगत असलेल्या सेट्रल बॅकेच्या समोर रस्त्यावर घेतली. याचवेळी सापळा लावून बसलेल्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली़ यावेळी महानवर यांना देखील ताब्यात घेण्यात आले़
ही कारवाई पोलीस उपधीक्षक किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक शाम पवरे, पोलीस निरीक्षक दिपक करांडे, हवालदार तनवीर शेख, पोलिस नाईक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गंगुल, राधा खेमनर, शोर रक्ताटे यांच्या पथकाने केली़