दोन बिबट्यांची झुंज; दोघेही गतप्राण, वाकडी येथील घटना
By शिवाजी पवार | Published: May 25, 2023 04:32 PM2023-05-25T16:32:55+5:302023-05-25T16:33:16+5:30
डोक्याला व गळ्याला दुखापत
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : वाकडी (ता.राहाता) येथे दोन बिबटे मृत अवस्थेत आढळून आले. दोन्ही बिबट्यांची झुंज होऊन त्यात ते ठार झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वाकडी येथे पानसरे वस्तीजवळ हे मृत बिबटे आढळले. स्थानिक शेतकरी गिताराम पानसरे हे शेतात कामासाठी गेले असता त्यांनी झोपलेल्या स्थितीतील बिबट्यांना पाहिले. त्यानंतर त्यांनी बाबासाहेब चौधरी या शेतकऱ्याला याबाबत माहिती दिली. मात्र बराच वेळ झाला तरीही बिबट्यांची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला.
दोन्ही बिबट्यांच्या डोक्याला व गळ्याला जबर दुखापत झालेली होती. अंगावर जखमा झालेल्या होत्या. त्यांची मोठी झुंज झाली असावी असे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.वन रक्षक संजय साखरे, वनपाल भाऊसाहेब गाढे यांच्या सूचनेवरून सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून स्थानिकांच्या मदतीने दोन्ही बिबट्यांचा अंत्यविधी करण्यात आला. वाकडी परिसरात बिबट्यांचे मोठे वास्तव्य आहे. रात्रीच्या वेळी ते शिकारीसाठी मानवी वस्तीकडे येतात. त्यामुळे शेतकरी भीतीचे वातावरणात आहेत.