कोपरगाव आगाराचे आणखी दोन कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:28 AM2021-06-16T04:28:48+5:302021-06-16T04:28:48+5:30
शनिवारी (दि. १२ जून) कोपरगाव आगारातील वर्कशाॅपमध्ये यांत्रिकी विभागातील आठ ते दहा कर्मचाऱ्यांचा पत्त्यांचा डाव रंगला होता. त्याचदरम्यान धुळे ...
शनिवारी (दि. १२ जून) कोपरगाव आगारातील वर्कशाॅपमध्ये यांत्रिकी विभागातील आठ ते दहा कर्मचाऱ्यांचा पत्त्यांचा डाव रंगला होता. त्याचदरम्यान धुळे जिल्ह्यातील शहादा आगाराची बस कोपरगाव आगारात दाखल झाली. या बसच्या चाकांमध्ये हवा कमी असल्याने संबंधित बसच्या वाहक-चालकाने वर्कशाॅपमध्ये जाऊन आपल्या बसची हवा चेक करण्याची विनंती कोपरगाव यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना केली. परंतु, पत्ते खेळण्यात मश्गुल असलेल्या कर्मचाऱ्यांनी या चालक-वाहकाला मदत करण्याऐवजी उद्धट उत्तरे देत बोळवण केली. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल होऊन नगर विभागीय कार्यालयापासून मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला होता. दरम्यान, कोपरगावचे आगारप्रमुख अभिजित चौधरी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार १३ जून रोजी याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
या व्हिडिओमध्ये सात ते आठ जण पत्ते खेळताना स्पष्ट दिसत असूनही आगारप्रमुखांनी केवळ चौघांवरच कारवाई केली. इतरांवर कारवाई न करण्यामागे काय गौडबंगाल आहे, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच मंगळवारी (दि. १४) आगारप्रमुखांनी आणखी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
दरम्यान, कोपरगाव यांत्रिकी विभागात काही कर्मचारी वर्षानुवर्षे कार्यरत असून, अधिकाऱ्यांनाही न जुमानता ते केवळ हजेरीपुरते कामावर येतात व निघून जातात. इतर कर्मचाऱ्यांवरही या खास कर्मचाऱ्यांची दादागिरी असते, त्यामुळे इतर कर्मचारी दबून राहतात. काही ठरावीक कर्मचारी काम करत नसल्याने त्याचा इतरांवर ताण येतो. त्यामुळे या कामचुकार कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
----------
या प्रकरणात एकूण सहा कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित केले आहे. या विभागाचे हेड मेकॅनिक (पाळीप्रमुख) त्या दिवशी वेळेच्या आधीच निघून गेले होते. त्यामुळे त्यांनाही नोटीस बजावली आहे. त्यांचा खुलासा आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
- अभिजित चौधरी, आगारप्रमुख, कोपरगाव