अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी विद्युत विभागाचे दोन अधिकारी दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 08:12 PM2018-01-16T20:12:54+5:302018-01-16T20:16:24+5:30
अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी विद्युत विभागाचे प्रमुख तथा शहर उपअभियंता रोहिदास सातपुते आणि इलेक्ट्रीक सुपरवायझर बाळासाहेब सावळे हे प्रथमदर्शनी दोषी असल्याची माहिती महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांना दिली.
अहमदनगर : महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी विद्युत विभागाचे प्रमुख तथा शहर उपअभियंता रोहिदास सातपुते आणि इलेक्ट्रीक सुपरवायझर बाळासाहेब सावळे हे प्रथमदर्शनी दोषी असल्याची माहिती महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांना दिली.
महापालिकेमार्फत शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि २८ मध्ये ४० लाख रुपये खर्चाचे पथदिवे बसविण्याच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी २९ डिसेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केला होता. त्यावर ३० डिसेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन चौकशी आणि दोषी अधिका-यांच्या निलंबनाची मागणी केली होती. आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे आणि सहायक नगररचना संचालक संतोष धोंगडे यांची चौकशी समिती नियुक्त केली. या चौकशीचा अहवाल दोन्ही अधिका-यांनी गत गुरुवारी आयुक्तांना सादर केला. त्या अहवालाचा अभ्यास करून आयुक्तांनी विद्युत विभागाचे प्रमुख सातपुते आणि सुपरवायझर सावळे यांना दोषी ठरवले आहे. चौकशी सुरू असतानाच या दोन्ही अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे.
पथदिव्यांच्या चौकशी अहवालाबाबात आयुक्त मंगळे म्हणाले, पथदिव्यांच्या १९ कामात घोटाळा झाला आहे. मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात, उपायुक्त (सामान्य) विक्रम दराडे, शहरअभियंता विलास सोनटक्के, विद्युत विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, सुपरवायझर बाळासाहेब सावळे, लेखा विभागातील लिपिक लोंढे, बिले तयार करणारा भरत काळे यांचे चौकशीदरम्यान जबाब घेण्यात आले.
तीन दिवसांत कामे पूर्ण
दोन प्रभागांत पहिल्या दिवशी प्रस्ताव मंजूर, दुस-या दिवशी कामे पूर्ण आणि तिस-या दिवशी बिले काढण्यात आली. महापालिकेत सर्वांत वेगाने कामे पूर्ण झाल्याचे दिसते. या १९ कामांची वेगवेगळ्या तीन तारखांना कामे कशी झाली, याची सविस्तर माहिती अहवालात नमूद करण्यात आली आहे. चौकशीसाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप झिरपे आणि ठेकेदार सचिन लोटके गैरहजर राहिले. बिलांवर सह्या करणा-या वरील दोघांसह शहरअभियंता आणि दोन प्रभाग अधिकारी अनुक्रमे जितेंद्र सारसर आणि नानासाहेब गोसावी यांचीही खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे.