देशांमध्ये दोघेजण हुकूमशाहीतून देश हातात घेत आहेत, माजी मंत्री भास्कर जाधव यांची टीका
By शेखर पानसरे | Published: January 7, 2024 07:39 PM2024-01-07T19:39:26+5:302024-01-07T19:42:13+5:30
संगमनेर : सध्या एकनिष्ठता राहिली नसून सत्तेसाठी लोक पक्ष बदलत आहेत. देशांमध्ये दोघेजण हुकूमशाहीतून देश हातात घेत आहेत, खोटा ...
संगमनेर: सध्या एकनिष्ठता राहिली नसून सत्तेसाठी लोक पक्ष बदलत आहेत. देशांमध्ये दोघेजण हुकूमशाहीतून देश हातात घेत आहेत, खोटा इतिहास सांगत आहेत. २०१४ ला स्वातंत्र्य मिळाले असे म्हणतात. मग १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले ते काय होते. ब्रिटिशांविरुद्ध लढताना त्यावेळी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. तुरुंगवास भोगला. त्यांची तुम्ही थट्टा करत आहात. अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केली.
स्वातंत्र्यसैनिक, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रविवारी (दि.७) संगमनेरातील जाणता राजा मैदान येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, माजीमंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते तथा माजीमंत्री भास्करराव जाधव, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, माजीमंत्री डॉ. विश्वजीत कदम , आमदार रवींद्र धंगेकर, आमदार झिशान सिद्दिकी, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार शिरीष चौधरी, आमदार राजेश राठोड, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार नामदेवराव पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार लहू कानडे आदी उपस्थित होते.