शेळ्या, मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू
By शेखर पानसरे | Published: April 26, 2023 07:43 PM2023-04-26T19:43:54+5:302023-04-26T19:44:33+5:30
मयतांमध्ये ३६ वर्षीय तरुण आणि १७ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
संगमनेर : शेळ्या, मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२६) दुपारी अडीच वाजण्याच्या पूर्वी संगमनेर तालुक्यातील नांदुरी फाटा येथे घडली. मयतांमध्ये ३६ वर्षीय तरुण आणि १७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
सोमनाथ कचरू जेडगुले (वय ३६, रा. धुळवाडची डोंगरची वाडी, ता . सिन्नर जि. नाशिक) आणि शुभम रावसाहेब कोटकर (वय १७, रा. पिंपळे, ता. संगमनेर) अशी मयतांची नावे आहेत. विलास खंडू शिरतार (वय २४, रा. धांदरफळ, गोडसेवाडी ता. संगमनेर) यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमनाथ जेडगुले आणि शुभम कोटकर हे दोघेही मेंढ्या धुण्यासाठी गेले होते.
त्यावेळी पाण्याच्या डोहात बुडून त्यांचा मृत्यू झाला. संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब घोडे अधिक तपास करीत आहेत.