लुटमार करणा-या दोघा दरोडेखोरांना अटक कारवाई: एकाच रात्री दोन ठिकाणी टाकला होता दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 05:43 PM2019-11-01T17:43:19+5:302019-11-01T17:44:25+5:30
जामखेड परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी दरोडा टाकून लुटमार करणा-या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंगापूर परिसरातून अटक केली़. या गुन्ह्यातील तीन दरोडेखोर फरार आहेत़.
अहमदनगर: जामखेड परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी दरोडा टाकून लुटमार करणा-या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंगापूर परिसरातून अटक केली़. या गुन्ह्यातील तीन दरोडेखोर फरार आहेत़.
दीपक उर्फ सलीम नारायण भोसले (रा. वाहिरा, आष्टी, बीड) व लखन उर्फ ढोल्या नारायण भोसले अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध नगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, टेंभुर्णी, बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलीस ठाण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. गोरख नारायण भोसले, नाज्या उर्फ सोमीनाथ नेह-या काळे, रावसाहेब विलास भोसले हे तिघेजण फरारी असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बुधवारी (दि़३०) रात्री जामखेडमधील आरोळेवस्ती येथील पवन सुभाष जाधव यांच्या घरावर या आरोपींनी दरोडा टाकला होता. पवन जाधव यांची आई व घरातील इतरांना मारहाण करीत पवन जाधव यांच्या बहिणीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेले होते. तर राजुरी येथील रणजित खाडे यांच्या घरातील लोकांना मारहाण करून सात हजार रुपये चोरून नेले होते. आरोपी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील नवाबपूर येथे नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण, सोन्याबापू नानेकर, संदीप घोडके, विशाल दळवी, रवींद्र कर्डिले, रवी सोनटक्के, संदीप दरंदले, मच्छिंद्र बर्डे, रवींद्र घुंगासे, दीपक शिंदे यांच्या सापळा रचून आरोपींना अटक केली़