दोन विद्यार्थ्यांना कैद
By Admin | Published: August 8, 2014 11:33 PM2014-08-08T23:33:16+5:302014-08-09T00:19:58+5:30
अहमदनगर : दोघा विद्यार्थ्यांना न्यायदंडाधिकारी एम. एस. तोडकर यांनी प्रत्येकी एक वर्षाची साधी कैदेची शिक्षा ठोठावली
अहमदनगर : एका विद्यार्थ्याच्या जागेवर दुसऱ्या विद्यार्थ्याने परीक्षा दिल्याने दोघाही विद्यार्थ्यांना दोषी ठरवून त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. तोडकर यांनी प्रत्येकी एक वर्षाची साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. परीक्षेतील ठकबाजीबद्दल झालेली ही पहिलीच शिक्षा असल्याचा दावा विधीज्ञांनी केला आहे.
नगर महाविद्यालयातील केंद्रावर बोर्डाच्या बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला ठकबाजीचा प्रकार घडला होता. १२ मार्च २००९ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गणिताच्या पेपरला हा प्रकार घडला होता. नगर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याच्या नावावर दुसऱ्याने परीक्षा दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. प्रवेशकुमार चंद्रशेखर मेहता (वय १९, रा. जनरल अरुणकुमार वैद्य कॉलनी, भिंगार) आणि निखिल देविदास धुलियॉ (वय १९, रा. आलमगीर, भिंगार) अशी त्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. धुलिया या विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर मेहता याने स्वत:चा रंगीत फोटो लावला आणि गणिताचा पेपर दिला. ही बाब नगर कॉलेज प्रशासनाच्या लक्षात आली. नगर कॉलेजचे प्रा. श्याम शरद खरात यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांविरुद्ध ठकबाजी केल्याचा गुन्हा दाखल केला. दोन्हीही आरोपींना पोलिसांनी अटक केली आणि ते जामिनावर सुटले होते. दरम्यान पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तोडकर यांच्यासमोर खटला सुरू झाला. त्याची दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. या प्रकरणात सरकारी पक्षाने १३ साक्षीदार तपासले.ठकबाजीच्या दोन्ही वेगवेगळ््या कलमांन्वये सहा महिने आणि एक वर्षाची साधी कैद आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा आणि पाचशे रुपये दंड असे शिक्षेचे स्वरुप आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. सचिन सूर्यवंशी आणि अॅड. संगीता ढगे यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांना मिळालेली ही पहिलीच शिक्षा असल्याचा दावा अॅड. सूर्यवंशी यांनी केला आहे. (प्रतिनिधी)