भीषण अपघातात दोन शिक्षिकांचा मृत्यू; नाशिक - पुणे महामार्गावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 09:39 PM2022-02-16T21:39:25+5:302022-02-16T21:39:34+5:30
शतपावली करताना काळाचा घाला
घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारातील बायपासजवळ कारच्या अपघातात दोन शिक्षिकांचा मृत्यू झाला. यात एक शिक्षिका महिला जागीच ठार झाली, तर दुसरी शिक्षिका महिला गंभीर जखमी झाली होती, जखमी झालेल्या शिक्षिकेला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पण दीड तासाने तिचाही मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १६) फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.
सुनीता रामदास माकोडे व नंदा रामनाथ पारधी या दोघी बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान बोटा बायपासजवळ शतपावली करत होत्या. नाशिक - पुणे महामार्गाने संगमनेरकडून आळेफाट्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एमएच -१४, इ वाय ७८७३ ) कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या उपरस्त्याकडे जात जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून दुसरी महिला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.
घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, किशोर लाड यांनी घटनास्थळी धाव घेत या अपघाताचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी संगमनेर येथील कुटिर रुग्णालयात दाखल केले.