नगरमधील दोन मंदिरे जमीनदोस्त; पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 07:51 PM2017-11-02T19:51:18+5:302017-11-02T19:54:46+5:30
कल्याण रोडवरील दोन मंदिरांवर महापालिकेने गुरुवारी पहाटेच्या सुमारास हातोडा टाकला. कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कारवाईला विरोध करणा-या हिंदू राष्ट्रसेनेच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
अहमदनगर : कल्याण रोडवरील दोन मंदिरांवर महापालिकेने गुरुवारी पहाटेच्या सुमारास हातोडा टाकला. कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कारवाईला विरोध करणा-या हिंदू राष्ट्रसेनेच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील दुस-या टप्प्यातील कारवाईला गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारस सुरूवात झाली. नगर-कल्याण रोडवरील दिनेश हॉटेल व जाधव पेट्रोल पंपाजवळील लक्ष्मी माता व मोहटादेवी मंदिर अशी दोन धार्मिक स्थळे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने पोलीस बंदोबस्तात हटविली. पहिल्या टप्प्यात २९ सप्टेंबर २००९ नंतरची ४ धार्मिक स्थळे ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी हटविण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी (दि.२) पहाटे दुस-या टप्प्यातील कारवाई सुरू झाली. दुस-या टप्प्यात रस्त्याला अडथळा ठरणा-या, फूटपाथवरील १९६० नंतर बांधकाम झालेल्या ६८ धार्मिक स्थळांचा समावेश आहे. महापालिका उपायुक्त विक्रम दराडे, अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख सुरेश इथापे, सहायक नगररचनाकार कल्याण बल्लाळ यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या पथकाने कल्याण रोडवरील लक्ष्मी माता व मोहटादेवी अशी दोन छोटी मंदिरे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. मंदिरातील मूर्ती विधिवत पूजा करून ताब्यात घेण्यात आल्या. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने मंदिर पाडण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, कोतवालीचे अभय परमार, दंगल नियंत्रण पथकासह १०० पोलिसांचा फौजफाटा कारवाईवेळी तैनात होता. कारवाईला विरोध करण्यासाठी आलेल्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बुधवारी रात्री १० वाजल्यापासूनच ७० ते ८० मनपा कर्मचारी व अधिकारी बंदोबस्त मिळण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. मात्र पहाटे दोन नंतर प्रत्यक्ष बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर पथके कारवाईसाठी रवाना झाली.
नियोजन कोलमडले
आधीच बंदोबस्तासाठी झालेला उशीर आणि त्यानंतर प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी महापालिकेच्या ताफ्यातील वाहनात झालेला बिघाड, जेसीबीवरील अप्रशिक्षित चालक यामुळे कारवाईला उशीर झाला. तीनवेळा चालक बदलला तरी जेसीबी कार्यान्वित झाला नाही.चार ते पाच स्थळांवर असलेले कारवाईचे नियोजन कोलमडले व दोन स्थळावर कारवाईकरून कारवाई आटोपण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसारच कारवाई सुरू करण्यात आली आहे. काही मंदिरांबाबत आक्षेप असून त्याबाबत समितीकडून विचार सुरू असल्याचे अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी पत्रकारांना सांगितले.