नगर-पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात दुचाकीस्वार ठार; चार जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 05:54 PM2019-05-04T17:54:01+5:302019-05-04T17:55:04+5:30
अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकी व टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात कैलास अनिल ससाणे (रा. खंडेश्वरी, जि. बीड) हा दुचाकीस्वार ठार झाला.
केडगाव : अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकी व टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात कैलास अनिल ससाणे (रा. खंडेश्वरी, जि. बीड) हा दुचाकीस्वार ठार झाला. त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. अपघातानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला भरधाव वेगातील आणखी दोन वाहने धडकली. या धडकेत इतर तीन जण जखमी झाले.
या अपघातानंतर अपघातग्रस्त तीन ते चार वाहने रस्त्यावरच उभी असल्याने अहमदनगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली होती. जखमींवर अहमदनगरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने रूग्णालयात हलवून अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला हटविली.
अहमदनगर-पुणे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने दुसऱ्या बाजूवरील वाहतूक अस्ताव्यस्त होऊन सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. नगर तालुका पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. बराच वेळ वाहतूक खोळंबल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.