इंधन दरवाढीच्या विरोधात युवकांनी ढकलल्या दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:53 AM2021-01-13T04:53:40+5:302021-01-13T04:53:40+5:30
शिर्डी : महागाईने जनता होरपळली असताना केंद्र सरकारने केलेल्या भरमसाठ पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वजण हवालदिल झाले आहेत. केंद्र सरकारच्या या ...
शिर्डी : महागाईने जनता होरपळली असताना केंद्र सरकारने केलेल्या भरमसाठ पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वजण हवालदिल झाले आहेत. केंद्र सरकारच्या या इंधन दरवाढीचा शिर्डीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दुचाकी रस्त्याने ढकलत प्रांताधिकारी कार्यालयाजवळ जोरदार घोषणाबाजी केली. तरुणांनी केंद्र सरकारचा निषेध करत अनोखे आंदोलन केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, उपतालुकाध्यक्ष सुधाकर शिंदे, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, युवकचे शहराध्यक्ष विशाल भडांगे, प्रकाश गोंदकर, दीपक गोंदकर, अमोल बानाईत, गौरव उबाळे, मिलिंद भालेराव, अभिषेक गोंदकर, प्रसाद चिने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना महामारीचे संकट व लाॅकडाऊनमुळे जनतेच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला आहे. हजारो कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. सर्वजण आर्थिक अडचणीत असताना केंद्र सरकारने इंधनाची अव्वाच्या सव्वाच्या दरवाढ केली आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवक राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला. निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठविल्याचे सोनवणे यांनी सांगितले.