अहमदनगर जिल्हा बँक भरतीतील प्रकार : गुणवत्ता यादीत येऊनही नियुक्ती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:42 PM2020-02-26T12:42:30+5:302020-02-26T12:43:41+5:30
जिल्हा बँकेने भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देताना ती साध्या टपालाने पाठवली आहेत. आपणाला हे नियुक्तीपत्रच मिळाले नाही अशी तक्रार नाशिक जिल्ह्यातील एका उमेदवाराने बँकेकडे केली आहे.
सुधीर लंके ।
अहमदनगर : जिल्हा बँकेने भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देताना ती साध्या टपालाने पाठवली आहेत. आपणाला हे नियुक्तीपत्रच मिळाले नाही अशी तक्रार नाशिक जिल्ह्यातील एका उमेदवाराने बँकेकडे केली आहे. विशेष म्हणजे हा उमेदवार गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकावर होता.
नगर जिल्हा बँकेने लिपिक, ज्युनिअर आॅफिसर आदी पदांच्या ४६५ जागांची भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरतीप्रक्रियेतील अनेक बाबी आक्षेपार्ह आहेत. ‘लोकमत’ने भरती प्रक्रियेतील अनियमितता समोर आणल्यानंतर राज्य शासनाने भरतीला स्थगिती देत भरतीची चौकशी केली. या चौकशीत भरतीत अनियमितता असल्याचे सिद्ध झाल्यानेभरती रद्द करण्यात आली. भरती रद्द झाल्यामुळे बँकेने निवड झालेल्या कुठल्याही उमेदवाराला नियुक्तीपत्रे पाठविली नाहीत.
दरम्यान, भरती प्रक्रियेतील काही उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. औरंगाबाद खंडपीठाने चौकशी समितीला ज्या ६४ उमेदवारांची निवड आक्षेपार्ह वाटली त्यांची फेरचौकशी करण्यात यावी असा आदेश दिला. त्यामुळे बँकेने एप्रिल २०१९ मध्ये हे ६४ उमेदवार वगळता अन्य उमेदवारांना
लगेचच नियुक्तीपत्रे पाठवून त्यांना नियुक्तीही दिली. यामध्ये ज्युनिअर आॅफिसर या पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गात प्रकल्पग्रस्त संवर्गात अंतरिम गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकावर असलेल्या विशाल बहिरम याला मात्र नियुक्ती मिळाली नाही.
दरम्यान, सहकार विभागाने ६४ उमेदवारांच्या भरतीची फेरचौकशी करुन त्यातील ६० उमेदवारांना क्लिन चिट दिली. बँकेने लगेचच या उमेदवारांनाही नियुक्ती दिली. मात्र, या सर्व प्रक्रियेत गुणवत्ता यादीत प्रथम स्थानावर असलेल्या बहिरम याला कोठेही नियुक्ती मिळाली नाही.
‘लोकमत’ने सहकार विभागाच्या फेरचौकशी अहवालावर मालिका प्रकाशित केली त्यावेळी बँकेच्या भरतीवरील स्थगिती उठल्याची माहिती बहिरम याला समजली व तो चौकशीसाठी बँकेकडे गेला. तेव्हा तुम्ही उशिराने आमच्याकडे आला आहात. आम्ही उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे, असे उत्तर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी या उमेदवाराला दिले.
उमेदवाराची तक्रार
जिल्हा बँकेची भरती रद्द झाल्याचे आम्ही वृत्तपत्रात वाचले होते. मात्र, भरतीवरील स्थगिती उठल्यानंतर बँकेने नियुक्तीबाबत मला काहीही कळविले नाही. बँकेने साध्या टपालाने नियुक्तीपत्र पाठविले होते असे बँक सांगते. मात्र हे नियुक्तीपत्र मला मिळालेले नाही. मला नियमानुसार नियुक्ती मिळावी, अशी मागणी विशाल बहिरम या उमेदवाराने बँकेकडे केली आहे. दरम्यान, बँकेने साध्या टपालाने नियुक्तीपत्रे का पाठवली? हाही प्रश्न आहे.
साध्या टपालाने नियुक्तीपत्रे का?
जिल्हा बँकेने सर्व उमेदवारांकडून परीक्षा शुल्क घेतले होते तर साध्या टपालाने नियुक्तीपत्रे का पाठवली असा प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांना केला असता, ‘आम्ही साध्या टपालानेच सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्र पाठविले. इतर उमेदवारांना हे पत्र मिळाले व या उमेदवाराला का मिळाले नाही हे सांगता येणार नाही’ असे उत्तर त्यांनी दिले. उमेदवाराने बँकेकडे तक्रार केली असेल तर संचालक मंडळ त्याचा निर्णय घेईल, असेही ते ‘लोकमत’ला म्हणाले. भरतीसारख्या महत्त्वाच्या विषयात बँकेने साध्या टपालाचा वापर का केला? याबाबत संशय आहे. सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्रे गेली का व प्रतीक्षा यादीतील नियुक्त्या कशा पद्धतीने दिल्या गेल्या? असाही प्रश्न यातून उपस्थित झाला आहे.