नगरमध्ये ब्राह्मण सेवा संघाकडून उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे दहन
By अरुण वाघमोडे | Updated: April 18, 2023 19:56 IST2023-04-18T19:55:58+5:302023-04-18T19:56:49+5:30
कारंजा चौकात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेचे दहन केले.

नगरमध्ये ब्राह्मण सेवा संघाकडून उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे दहन
अहमदनगर: राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये केलेल्या भाषणातून 'आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही' असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज (दि.18) जिल्हा ब्राह्मण सेवा संघाच्यावतीने शहरातील चौपाटी कारंजा चौकात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेचे दहन केले.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यातून समस्त ब्राम्हण समाजाचा अपमान केल्याचा अरोप यावेळी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष किशोर जोशी, चौपाटी कारंजा मित्रमंडळाचे अध्यक्ष अमोल भंडारे, मकरंद भट, किशोर भणगे, अवधूत जोशी, सचिन उपकारे, चंद्रकांत कलवडे व अनिल कलवडे उपस्थित होते. यावेळी किशोर जोशी म्हणाले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेताल वक्तव्य करत समस्त ब्राह्मण समाजाचा अपमान केला आहे.
पुरातन काळापासून शेंडी आणि जानवे असणाऱ्या ब्राम्हण समाजाने हिंदुत्व टिकून ठेवले आहे. मुघलांचे आक्रमणे होत होते तरीदेखील प्राणाची पर्वा न करता शेंडी जानवे, धारण करणारा ब्राम्हण समाज आपले धर्म कार्य करत होता. आज देखील ब्राम्हण समाज तेव्हढ्याच निष्ठेने ते कार्य कर्तव्याच्या भावनेने करत आहे.