उदगीर नगरी सज्ज जाहली स्वागताला...; संमेलन गीताचा नगरला बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 01:26 PM2022-04-20T13:26:15+5:302022-04-20T13:28:23+5:30

‘उदगीर नगरी सज्ज जाहली, इथे स्वागताला, चैतन्याची पहाट फुलली, उदय नवा झाला’ या त्यांच्या गीताने यावर्षी संमेलनातील श्रोत्यांचे स्वागत होणार आहे.

Udgir nagri sajja jahali swagatala ...; Sammelan song honor to the Ahmednagar | उदगीर नगरी सज्ज जाहली स्वागताला...; संमेलन गीताचा नगरला बहुमान

उदगीर नगरी सज्ज जाहली स्वागताला...; संमेलन गीताचा नगरला बहुमान

शिवाजी पवार -

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलन गीत लिहिण्याचा मान यंदा येथील चित्रपट  गीतकार व निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर यांना मिळाला आहे. मराठी भाषा गौरव आणि आयोजन स्थळाच्या वैभवावर प्रकाश टाकणारी ही गीत रचना असून त्याची चित्रफित नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. कवी सौदागर यांच्यामुळे नगर जिल्ह्याला प्रथमच साहित्य संमेलनाच्या गीत लेखनाचा मान मिळाला आहे.  

‘उदगीर नगरी सज्ज जाहली, इथे स्वागताला, चैतन्याची पहाट फुलली, उदय नवा झाला’ या त्यांच्या गीताने यावर्षी संमेलनातील श्रोत्यांचे स्वागत होणार आहे. संमेलन गीतामध्ये उदगीरचा इतिहास, तेथील दिवंगत प्रतिभावान लेखक प्र. ई. सोनकांबळे यांच्या ‘आठवणीतील पक्षी’ हा लेखसंग्रह, उदागीर बाबांची महती, तसेच उदयगिरी महाविद्यालयाच्या उभारणीवर प्रकाश टाकला आहे. आपल्या अभिजात मराठी भाषेचा गौरव या गीतातून केला आहे, असे सौदागर यांनी सांगितले.    
संगीतकार आनंदी विकास यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. ‘दुनियादारी’ चित्रपट फेम गायक मंगेश बोरगावकर व शेफाली कुलकर्णी साकुरीकर यांनी गीत गायिले आहे. पुण्यात या गीताचे ध्वनिमुद्रण करण्यात आले. 

संमेलनाचे कार्यवाह रामचंद्र तिरुखे व बसवराज पाटील नागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी माझ्या गीताची निवड केली. प्रारंभी गीतासाठी मराठवाड्यातील काही कवींकडून रचना मागविण्यात आल्या होत्या; मात्र बसवराज पाटील नागराळकर यांना माझे गीत अधिक भावले.  
    - बाबासाहेब सौदागर, गीतकार  

बाबासाहेब सौदागर यांचे शब्द खूपच प्रभावी असल्यामुळे त्या शब्दांना चाल देताना खूप मजा आली. शब्द जेव्हा लय घेऊन जन्माला येतात तेव्हा त्याची सुरावट तरल बनण्यासाठी सहजता येऊ लागते. ढोल ताशे नाही लागत प्रत्येक वेळी चैतन्य अंगी येण्यासाठी... 
- आनंदी विकास, संगीतकार       

उदगीरच्या संमेलनात सांगितिक खारीचा वाटा उचलता आला, याचा लातूरकर म्हणून मनस्वी आनंद झाला आहे. आम्ही गायलेले हे सुंदर संमेलन गीत साहित्यिकांना आवडेल. या गीतामध्ये उदगीरचा इतिहास, मराठवाड्यातील माणसांचा गोड स्वभाव, कानडी-तेलंगणाशी असलेले संबंध शब्दबद्ध झाले आहे.      - मंगेश बोरगावकर, गायक 

‘अश्मक’मधून उलगडणार उदगीरची साहित्य संस्कृती -
उदगीरमधील साहित्य संमेलनाचे औचित्य अधोरेखित करणारी  ‘अश्मक’ ही स्मरणिका साहित्य रसिकांच्या  भेटीला येणार आहे.   
उदगीर हे प्राचीन काळातील सोळा महाजनपैकी ‘अश्मक’ या जनपदात येणारे नगर होते. या जनपदात आजचे लातूर, उस्मानाबाद, नांदेड व बीड हे चार जिल्हे, आदिलाबाद, निजामाबाद व मेदक हे तेलंगणातील तीन जिल्हे आणि कर्नाटकातील बीदर जिल्हा येतो. या प्रदेशाने सातवाहन, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकुट, वाकाटक यादवांसह बहामनी आदी राजवटी अनुभवल्या. इ.स. पूर्व सहाव्या शतकापासून या प्रदेशाची नोंद सापडते. तेलंगणातील ‘बोधन’ हे ‘अश्मक’ प्रदेशाच्या राजधानीचे शहर होते. या प्रदेशाच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक परंपरेचे यथार्थ  दर्शन घडावे म्हणून स्मरणिकेला ‘अश्मक’ हे शीर्षक दिल्याचे स्मरणिकेचे संपादक प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांनी सांगितले.
 

Web Title: Udgir nagri sajja jahali swagatala ...; Sammelan song honor to the Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.