जामखेड येथील दुहेरी हत्याकांड खटल्यात उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती, राजकीय वैमनस्यातून झाली होती दोघांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 09:27 PM2020-07-07T21:27:38+5:302020-07-07T21:28:36+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या युवकांची भरदिवसा पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या झाली होती. या दुहेरी हत्याकांड खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने अॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली आहे.

उल्हास माने यांच्या तालिमीतील काही मुले आणि मयत योगेश आणि राकेश यांचा वाद झाला होता. या वादातून जामखेड शहरात २८ एप्रिल २०१८ मध्ये दुहेरी हत्याकांड झाले होते. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, उल्हास माने, त्याचा बंधू, दत्ता ऊर्फ स्वामी गायकवाड या सर्वांनी इतर आरोपींच्या सहाय्याने या दुहेरी खुनाचा कट रचला. त्यानंतर पिस्तुलातून गोळ्या झाडून दोघांची निर्घृण हत्या केली होती. या दुहेरी हत्याकांडातील आरोपी असलेल्या माने बंधूंनी जामीन मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली होती. या घटनेचे स्वरूप अणि माने बंधू यांचा गुन्ह्यातील सहभाग पाहून सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी एक वर्षाच्या आत निकाली करण्यासंबंधी निर्देश दिले आहेत.
या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने प्रसिद्ध वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. या संबंधीची अधिसूचना नुकतीच विधी आणि न्याय विभागाने जारी केली आहे. यादव यांच्या नियुक्तीबद्दल पीडित राळेभात कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करून या प्रकरणी गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. याबाबत यादव यांच्याशी संपर्क साधला असता १० जुलै रोजी श्रीगोंदा जिल्हा न्यायालयात या खटल्याबाबत सुनावणी असल्याचे त्यांनी सांगितले.