नितीन आगे खून खटल्यात उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 05:32 PM2018-01-23T17:32:17+5:302018-01-23T17:32:38+5:30
राज्यभर गाजलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यात आता सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकिल अॅड. उमेशचंद्र यादव-पाटील हे काम पाहणार आहेत.
अहमदनगर: राज्यभर गाजलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यात आता सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकिल अॅड. उमेशचंद्र यादव-पाटील हे काम पाहणार आहेत. मंगळवारी विधी व न्याय मंत्रालयाने यादव यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे.
नितीन आगे खून खटल्यात २६ पैकी महत्त्वाचे १४ साक्षीदार फितूर झाल्याने पुराव्याअभावी जिल्हा न्यायाल्याने २३ नोव्हेंबर २०१७ रोजी ९ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर राज्य सरकारी औरंगाबाद खंडपीठात अपील केले. या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून अॅड. यादव यांची नियुक्ती करावी अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली होती. अखेर राज्य सरकारने यादव यांची नियुक्ती केली आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे २८ एप्रिल २०१४ रोजी नितीन आगेची हत्या करण्यात आली होती. गावातील वरिष्ठ जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून नितीनची संपूर्ण गावासमक्ष निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाकडे सुरुवातीला पोलिसांनी डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीनच्या हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर प्रशासनाला जाग आली. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नितीन आगे हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले होते.
याप्रकरणी नितीनचे वडील राजू आगे यांनी गावातील सचिन गोलेकर आणि शेषराव येवले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी संबंधित मुलीचा भाऊ आणि तीन अल्पवयीन मुलांसह ९ जणांना अटक केली होती. या सर्वांवर हत्या आणि अन्य गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र सबळ पुराव्याअभावी जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची सुटका केली.