महापालिकेचे स्थायी समितीचे बेकायदेशीर ठराव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:47 AM2018-09-28T11:47:25+5:302018-09-28T11:51:18+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभांचे इतिवृत्त लिहिताना काही विषय ऐनवेळी घुसडण्यात आले होते. असे तब्बल १८ विषय राज्य शासनाने रद्द केले आहेत.
अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभांचे इतिवृत्त लिहिताना काही विषय ऐनवेळी घुसडण्यात आले होते. असे तब्बल १८ विषय राज्य शासनाने रद्द केले आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला चांगलाच दणका बसला आहे. याबाबतचे नगरविकास खात्याचे पत्र गुरुवारी महापालिकेला प्राप्त झाले.
महापालिकेच्या सभेचे इतिवृत्त लिहिताना ‘तसेच’ हा शब्द जोडून सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर नसलेले व सभेत चर्चा न झालेले विषय घुसडले जातात. नगरसेवकांशी संबंधित व आर्थिक विषय ‘तसेच’ हा शब्द जोडून मूळ विषयांच्या मंजुरीसह या विषयांना बेकायदेशीरपणे मंजुरी दिली जाते. यात राजकीय लागेबांधे असल्याने अशा विषयांवर चर्चा कधीच होत नव्हती. मात्र याबाबत जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी थेट राज्य शासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल न घेतल्याने मुळे यांनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार दिलीप गांधी यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी होऊन अखेर शासनाने सदरचे ठराव रद्द केले आहेत. याबाबतचे पत्र महापालिका आयुक्तांना गुरुवारी सायंकाळी मिळाले. ‘जागरूक’चे मुळे यांनी स्थायी समितीच्या १० एप्रिल २०१७ रोजी झालेल्या सभेतील बेकायदा ठरावांसह १६ फेब्रुवारी २०१७, ३ जून २०१७, ३ जुलै २०१७ व १७ डिसेंबर २०१६ या पाच सभांमध्ये ‘तसेच’ शब्दाच्या आधारे झालेल्या बेकायदा ठरावांची माहिती संकलित केली होती. तक्रारीतील संबंधित पाच ठरावांवर नगरसेवक दिलीप सातपुते, मनोज दुलम, मुदस्सर शेख, बाळासाहेब बोराटे, सुनीता भिंगारदिवे, सुनीता फुलसौंदर, उषा नलावडे आदी नगरसेवकांची सूचक व अनुमोदक म्हणून नावे आहेत. ‘तसेच’ शब्दाआधारे झालेल्या ठरावांची माहितीच नसल्याचा पवित्रा संबंधित नगरसेवकांनी घेतला आहे.
हे होते वादग्रस्त विषय
महादेव कोलते (बोल्हेगाव रोड, नागापूर) यांच्याकडे नळ कनेक्शन नसल्याने त्यांना आकारलेली पाणीपट्टी निर्लेखित करणे
डॉ. संदीप सुराणा यांना आरक्षण क्रमांक ७० या आरक्षित भूखंडात विकसित करून तळमजला, पहिला मजला व दुसरा मजला असे १८६ चौरस मीटर बांधकाम करण्यास मंजुरी देणे.
महापालिकेची रिकामी मिळकत ११ वर्षे मुदतीने देणे.
विलास काळभोर (बोल्हेगाव रोड, नागापूर) यांची पाणीपट्टी निर्लेखित करणे.
राज चेंबरमधील बिल्डिंग बी शेजारील खुल्या जागेपैकी १५ बाय ३५ चौरस फूट मोकळी जागा नईमोद्दीन काझी यांना देणे.
गजानन पंगुडवाले यांना प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रालगतची १० बाय १५ चौरस फूट मोकळी जागा व्यवसायासाठी ११ वर्षे मुदतीने देणे.
एमआयडीसी एल व एम ब्लॉकमधील रोहिदास वाबळे व अन्य सात जणांची घरपट्टी निर्लेखित करणे.
विद्या कॉलनी ते शितळे घर ते समता कॉलनी ते भंडारी घरापर्यंत रस्ता डांबरीकरण मजबुतीकरण .
छबुबाई विश्वनाथ ठोंबे यांना नळ कनेक्शन नसताना आकारलेली ११ हजार ५१३ रुपयांची पाणीपट्टी निर्लेखित करणे.
मोहित मदान यांना नोबल हॉस्पिटललगत व राजेंद्र सैंदर यांना जुना दाणे डबरा ते ग्राहक भांडार परिसरातील जागा पे अँड पार्किं गसाठी भाडेतत्त्वावर देणे.
प्रमोद ठुबे यांना केडगाव अंबिकानगर बसस्टॉपजवळील बालाजी कॉम्प्लेक्सशेजारील १० बाय १५ फूट मोकळी जागा व्यवसायासाठी देणे.
महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात परिचारिका पुनर्नियुक्ती करणे.
सागर भालेराव यांना गाडगीळ पटांगण शॉपिंग सेंटर भाजी मार्केट भिंतीलगत खुल्या जागेपैकी १० बाय १० चौरस फूट जागा व्यवसायासाठी देणे.
अजिंक्य नांगरे यांना नवीन एसटी स्टँड, स्वस्तिक चौक येथे १० बाय १२ चौरस फूट मोकळी जागा व्यवसायाकरिता भाडेतत्वावर देणे.
गणेश शिंदे व गोपीनाथ कवडे यांच्या जागेचे भाडेकरार वाढवून देणे.
हेमंत पांडे (तांगेगल्ली, नगर) यांना २० बाय १५ चौरस फूट जागा व्यवसायासाठी भाडेतत्वावर देणे.