दोन सख्ख्या भावांसह मामाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:19 AM2021-01-18T04:19:25+5:302021-01-18T04:19:25+5:30
संगमनेर (जि. अहमदनगर) : खाणीत साचलेल्या पावसाच्या पाण्यात शेळ्या धुण्यासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ व त्यांना वाचविण्यासाठी गेलेले त्यांचे ...
संगमनेर (जि. अहमदनगर) : खाणीत साचलेल्या पावसाच्या पाण्यात शेळ्या धुण्यासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ व त्यांना वाचविण्यासाठी गेलेले त्यांचे मामा अशा तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. १७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गणेशवाडी येथे घडली.
संजय भाऊसाहेब खर्डे (वय ४०, रा. गणेशवाडी, झोळे, ता. संगमनेर), सूरज संतोष गाढवे (वय १५) व मयूर संतोष गाढवे (वय १२, रा. कर्जुलेपठार, ता. संगमनेर) अशी या मृतांची नावे आहेत. खर्डे यांचे चुलत भाऊ भाऊराव कारभारी खर्डे यांनी दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूरज व मयूर गाढवे हे दोघेही मामा संजय खर्डे यांच्याकडे गणेशवाडी येथे शिक्षणासाठी राहत होते. सूरज व मयूर हे दोघे रविवारी शेळ्या चारण्यासाठी गेले होते. गणेशवाडी परिसरात दगडाची खाण असून त्या खाणीत पावसाचे पाणी साचलेले आहे. शेळ्या चरून झाल्यानंतर शेळ्या धुण्यासाठी व शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी हे दोघे शेळ्या घेऊन पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. हा प्रकार त्यांचे मामा संजय खर्डे यांनी पाहिला. ते त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरले; मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडू लागले. खाणीत साचलेल्या पाण्यात मामा-भाचे बुडत असल्याचे परिसरातील ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी अनेकांनी खाणीकडे धाव घेतली. या तिघांना पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता हे तिघेही मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फाैजदार पी. एन. ताेरकडी अधिक तपास करीत आहेत.