काका, मामा, मावशी पाहू द्या बोट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:21+5:302021-05-05T04:34:21+5:30
लोणी : काका, मामा, मावशी कोणाला ताप येतो का? खोकला आहे का? सर्दी-पडसे नाही ना, असे प्रश्न विचारत.., ...
लोणी : काका, मामा, मावशी कोणाला ताप येतो का? खोकला आहे का? सर्दी-पडसे नाही ना, असे प्रश्न विचारत.., पाहू द्या तुमचे बोट असे म्हणत बोटाला ऑक्सिमीटर लावून ऑक्सिजन पातळी तपासण्याचे व नोंदण्याचे काम राहाता तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ३५० शिक्षक करीत आहेत.
राहाता तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा पाहता घरोघरी जाऊन आजाराबाबत माहिती घेण्यासाठी झीरो डेथ मिशन मोहीम सुरू आहे. यात राहाता तालुक्यातील ६५०पैकी जावळपास सुमारे ३५० शिक्षक कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात १२५ महिला शिक्षकांचा समावेश आहे. हातात ऑक्सिजन मापक यंत्र घेऊन नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या तपासणीसाठी शिक्षकांसह अन्य कर्मचारी थेट बांधावर जाऊन नागरिकांशी संवाद करीत आहेत.
तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांच्या नियोजनातून ही मोहीम सुरू आहे. कोरोनाचा धसका आता सर्वांनीच घेतला असल्याने मोहिमेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना आता नागरिकांकडून प्रतिसाद दिला जात असल्याचे दिसत आहे.
गतवर्षी पाऊस चांगला झाला होता. परिणामी उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असून, उन्हाळी हंगाम घेण्यासाठी शेतकरी व त्याचे कुटुंबीय उन्हातान्हात शेतात राबत आहेत. घर बंद असल्याने हे शिक्षक कर्मचारी थेट शेतावर बांधावर जाऊन माहिती घेत आणि तपासणी करत नागरिकांना मानसिक धीर देण्याचे काम करत आहेत.
.................
गांभीर्य ठेवले पाहिजे
कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनीच गांभीर्य ठेवले पाहिजे. काही दिवस तरी हा सामूहिक लढा लढावा लागणार असून, त्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ. नागरिकांनी नियमावलीचे उल्लंघन करू नये.
- पोपटराव काळे,
गटशिक्षणाधिकारी,
राहाता.
..............
शिक्षकांचा मदतीचा हात
राहाता तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी साडेचार लाख रुपयांचा निधी जमा केला असून, या निधीतून शिर्डी आणि लोणी येथील सरकारी कोविड सेंटरला १०० वाफ घेण्याचे मशीन, लोणी येथे सरकारी ग्रामीण रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांना चहा-बिस्किटांची सोय, शिर्डी येथील कोविड सेंटर आणि तालुक्यातील ६ सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. बुधवारी (५ मे) पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने हा लोकार्पण सोहळा हे शिक्षक करणार आहेत.
...... लोणी .......