मामाने भाच्यालाच घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 06:45 PM2021-05-19T18:45:46+5:302021-05-19T18:47:38+5:30
भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या भाच्यालाच मामा, मामी व मामाच्या मित्राने फसविल्याचा प्रकार समोर आला आहे.
संगमनेर : भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या भाच्यालाच मामा, मामी व मामाच्या मित्राने फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. सेवानिवृत्तीचे पैसे गुंतवून दामदुप्पट न देता फसवणूक झाल्याने माजी सैनिकाने सख्खा मामा व मामी तसेच मामाचा मित्र या तिघांविरोधात मंगळवारी (दि. १९) संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मामा व त्यांच्या मित्राला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मारुती रखमाजी उंबरकर (मामा, रा. उंबरी बाळापूर, ता. संगमनेर), अर्जुन गणपत आंधळे (मामाचा मित्र, रा. प्रतापपूर, ता. संगमनेर) व चंद्रकला मारुती उंबरकर (मामी, रा. उंबरी बाळापूर, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक मच्छिंद्र मारुती पानसरे ( रा. जाखुरी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मच्छिंद्र पानसरे हे २०१५ ला भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे मामा मारुती उंबरकर व मामाचा मित्र अर्जुन आंधळे हे दोघे पानसरे यांच्या घरी जावून त्यांना भेटले. ‘अर्थव ४ यु इन्फ्रा ॲन्ड ॲग्रॉ लिमि. नावाची मुंबईची कंपनी असून आम्ही तिचे काम पाहतो. आमच्या कंपनीत तू पैसे गुंतव, चार वर्षात तुम्हाला त्याचा परतावा दामदुप्पटीने मिळेल.’ असे त्यांनी पानसरे यांना सांगितले. पैसे दामदुप्पट न झाल्यास आम्ही आमची जमीन विकून पैसे देऊ. असा विश्वासही त्यांनी दिला. सख्या मामाने हे सांगितल्यानंतर पानसरे यांनी त्यावर विश्वास ठेवत पहिल्यांदा ५० हजार रूपये गुंतविले. त्यांची पावतीही पानसरे यांना देण्यात आली.
२०१४ पासून ते आतापर्यंत पानसरे यांनी अर्थव ४ यु इन्फ्रा ॲन्ड ॲग्रॉ लिमि या कंपनीत मामा, मामा व मामाच्या मित्राच्या सांगण्यावरून एकूण ५ लाख ३६ हजार रूपये गुंतविले आहेत. ठेव पावत्यांची मुदत संपल्यानंतर पानसरे हे त्यांच्याकडे पैश्यांची मागणी करू लागले. वारंवार पैसे मागितल्यानंतर सहा महिन्यांनी सर्व पैसे मिळतील. असे पानसरे यांना सांगण्यात आले. मात्र, अजूनही पैसे न मिळाल्याने पानसरे यांनी मामा, मामी व मामाचा मित्र या तिघांविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी मारुती उंबरकर व अर्जुन आंधळे यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे अधिक तपास करीत आहेत.