नगर जिल्ह्यातील १८ कृषिसेवा केंद्रांत विनापरवाना कीटकनाशके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 10:46 AM2017-11-07T10:46:05+5:302017-11-07T10:51:19+5:30
कीटकनाशकांसह इतर कृषी उत्पादकांच्या विक्रीबाबतच्या धोरणात बदल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये कीटकनाशकेदर्जेदार असले तरी विक्री करताना त्याचा परवाना कृषिसेवा केंद्रचालकाकडे असणे बंधनकारक आहे.
अहमदनगर : कृषिसेवा केंद्रांतून विक्री होणा-या कीटकनाशकांची तपासणी कृषी विभागाने सुरू केली असून, जिल्ह्यातील १८ कृषिसेवा केंद्रांत विनापरवाना कीटकनाशकांची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे़ उगमप्रमाणपत्रात समावेश नसलेल्या कीटकनाशकांची विक्री कृषी विभागाकडून थांबविण्यात आली आहे. बंदी घातलेल्या कीटकनाशकांची किंमत काही लाखांच्या घरात आहे.
यवतमाळ येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाने कृषिसेवा केंद्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. कीटकनाशकांसह इतर कृषी उत्पादकांच्या विक्रीबाबतच्या धोरणात बदल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये कीटकनाशकेदर्जेदार असले तरी विक्री करताना त्याचा परवाना कृषिसेवा केंद्रचालकाकडे असणे बंधनकारक आहे. कृषिसेवा केंद्र सुरू करण्यास किंवा नूतनीकरणाचा परवाना कृषी विभाग देत असते़ या परवान्यात ज्या कीटकनाशकांचा समावेश नाही, अशी कीटकनाशके विक्री करता येत नाहीत. शासनाच्या आदेशानुसार उगमप्रमाणपत्र आणि प्रत्यक्षात विक्री होणा-या कीटकनाशकांची तपासणी निरीक्षकांमार्फत करण्यात येत आहे. तालुका कृषी निरीक्षकांनी केलेल्या तपासणीचा अहवाला नुकताच जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. गेल्या महिनाभरात केलेल्या तपासणीत १८ कृषिसेवा केंद्रांतून परवाना नसलेली कीटकनाशके विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. या कीटकनाशकांचा साठा बाजूला ठेवून तो विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कीटकनाशकांसोबत विक्री केल्या जाणा-या संजिविकांच्या विक्रीवरही बंदी आहे. कीटकनाशके आणि त्यासोबत दिली जाणारी संजिविके याचीही तपासणी सुरू आहे. कृषिसेवा केंद्रांमागे तपासणीचे शुक्लकाष्ठ लागले आहे. कृषिसेवा केंद्रचालकांकडे मोजकेच कीटकनाशके विक्रीचा परवाना असतो. प्रत्यक्षात मात्र ते अनेक कंपन्यांचे कीटकनाशके विकतात. त्यामुळे कीटकनाशकांच्या विक्रीवर कोणतेही नियंत्रण नव्हते़ त्यावर नियंत्रण आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे़ त्याचाच एक भाग म्हणून ही तपासणी करण्यात येत आहे, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
सहा कृषिसेवा केंद्रांत कीटकनाशके विक्रीस बंदी
कोपरगाव, नगर, काष्टी, नाटेगाव, चासनळी, कोपरगाव शहर, बेलापूर, जामखेड आदी ठिकाणांच्या कृषिसेवा केंद्रांचा समावेश आहे.