अशिक्षित गिरजाबाईंनी उभारला पोषण बगीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:20 AM2021-03-08T04:20:45+5:302021-03-08T04:20:45+5:30
महिला दिन विशेष कोतूळ : आदिवासी भागात कुपोषण ही डोकेदुखी ठरत आहे. राज्यात, देशात हजारो कोटी खर्चून यावर उपाय ...
महिला दिन विशेष
कोतूळ : आदिवासी भागात कुपोषण ही डोकेदुखी ठरत आहे. राज्यात, देशात हजारो कोटी खर्चून यावर उपाय शोधता आला नाही. मात्र, अकोले तालुक्यातील गिरजाबाई शांताराम बारामते या अशिक्षित महिलेने पोषण बगीचा उभा केला. यावरच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कुपोषणाविरुद्ध लढा देत ‘न्यूट्रीशिअन सिस्टर’ हे नाव सार्थकी लावले आहे.
अकोले तालुक्यातील धामणवन हे डोंगराळ आदिवासी गाव. पावसाळ्यात भरपूर पाऊस तर डिसेंबरनंतर प्यायला पाणी नाही. तिथे बागायती क्षेत्र हे स्वप्नच. याच गावातील ३५ वर्षांच्या गिरजाबाई शांताराम बारामते. या अशिक्षित महिला. १७ वर्षांपूर्वी त्यांचे या गावातील शांताराम यांच्याशी लग्न झाले. पहिला मुलाच्या वेळी अंगणवाडीताई व टीव्हीवर आदिवासी कुपोषणावर त्यांनी ऐकले. आपल्या मुलांच्या, नातेवाइकांना आणि समाजाला ही पिडा नको, म्हणून आपण काहीतरी करू म्हणून त्यांनी शेताच्या बांधावर फणस, आंबा, केळी, चिकू, शेवगा, आवळा, लिंबू ही झाडे लावली. पावसाळ्यात हिरव्या भाज्या लावल्या. भाज्यांच्या आहाराने आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसल्याने गिरजाबाईंना नवी दिशा मिळाली.
उन्हाळ्यात डोक्यावर पाणी घालून फळझाडे जिवापाड जपली. आज फणस, आंबे बहरलेत. जिल्ह्यात पहिल्यांदा त्यांनी कृषी विभागाच्या भगवान वाकचौरे व शरद लोहकरे यांच्या मदतीने बांधावर तीन वर्षांपूर्वी दालचिनी, चारोळी लागवड केली. यंदा मिरे उत्पादन मिळणार आहे, तर गिरजाबाईंनी उन्हाळ्यात पाणी मिळावे, यासाठी तीन वर्षांपूर्वी कृषी योजनेतून शेततळे घेतले. शेततळ्यावर मत्स्यशेती केली. दोन वर्षांत त्यांनी यातून लाखाचे उत्पादन घेतले.
उन्हाळ्यात जंगलात पाणी नसल्याने मधमाश्या तळ्यावर यायच्या, यातून नवी संकल्पना सुचली. रात्री रानातून छोटी मोहळे फांदीसह काढून आणायची. परसबागेत झाडावर बांधायची. त्यांना साखरपाणी द्यायचे. मधमाश्यांना मध संकलनासाठी सूर्यफूल व फुलझाडे लावली. सूर्यफूल तेल काढून त्या घरी वापरू लागल्या, तर गोठ्यात तूप, दुधासाठी डांगी गायी व अंड्यांसाठी गावरान कोंबड्याही पाळल्या.
यंदा गिरजाबाईंनी तालुक्यात पहिल्यांदा मल्चिंगवर उन्हाळी भात व नाचणी, मिरची व टरबूज लागवड केली आहे, तर पोषण बगीचात चवळी, भोपळा, वाल, कारली, टाॅमॅटो, भेंडी, वांगी, तूर, गवार, कोथंबीर, पालक, मेथी, शेपू, राजगीरा असे वाण केले. नातेवाइकांना वानवळा तर आसपासच्या आदिवासी बांधवांना अल्पदरात ते भाज्या, मासे उपलब्ध करून देतात. हे सर्व सेंद्रीय पद्धतीने असल्याने बाजारात विक्रीसाठी न्यावे लागत नाही. घरीच लोक न्यायला येतात.
...
मधमाशी पालनातूनही उत्पन्न
सध्या झाडावर डझनभर तर १५ पेटीत मधमाशी पालन केले आहे. या मधातून त्यांना तीन वर्षांपासून सरासरी तीस हजार मिळतात.
गिरजाबाईंनी घर चालवता-चालवता समाज, कुटुंब आणि नातेवाइकांना संतुलित आहार उपलब्ध करून देतात. कुपोषणावर मात करण्यासाठी उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर केल्याने त्या ‘न्यूट्रीशिअन सिस्टर’ ठरल्या आहेत.
....
बारामते कुटुंबाने केलेला प्रयोग राज्यासाठी पथदर्शी आहे. मी स्वतः दोनदा भेट दिली. गिरजाबाई कुपोषणविरुद्ध लढणाऱ्या आयडाॅल आहेत. कृषी विभागाचे तालुका स्तरावरील अधिकारी त्यांना सहकार्य करतात.
- सुधाकर बोराळे, विभागीय कृषी अधिकारी