जिल्ह्यातील संगीत शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:55+5:302021-05-25T04:23:55+5:30

पळवे : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने जिल्ह्यातील संगीत विद्यालये, खासगी शिकवण्यांच्या संगीत शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली ...

Unemployment ax on music teachers in the district | जिल्ह्यातील संगीत शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

जिल्ह्यातील संगीत शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

पळवे

: सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने जिल्ह्यातील संगीत विद्यालये, खासगी शिकवण्यांच्या संगीत शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी काही जण मिळेल ते काम करीत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून बचावासाठी सध्या लॉकडाऊन सुरू आहे. जिल्ह्यातील संगीत विद्यालये, खासगी शिकवण्याही गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. यामुळे संगीत शिक्षण क्षेत्रावर सध्या मोठे संकट कोसळले आहे. मुलांना गायन, वादन, नृत्य आदी कला आत्मसात करण्यासाठी तज्ज्ञ तसेच विशारद, अलंकारसारख्या शैक्षणिक पात्रता घेऊन ज्ञानदानाचे काम करणारे कलाकार, संगीत शिक्षक खासगी संगीत विद्यालये किंवा शिकवण्या चालवितात.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात अशी साधारण सात ते दहा खासगी संगीत विद्यालये व काही खासगी शिकवण्याही आहेत. यातून संपूर्ण जिल्ह्यातील मिळून साधारण दोनशेच्यावर खासगी संगीत विद्यालये व शिकवण्या बंद आहेत. त्यामुळे यामध्ये शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी संगीताचे धडे गिरविण्यापासून वंचित आहेत. पर्यायाने भविष्यात घडणाऱ्या कलाकारांवरही मोठा परिणाम होण्याची भीती अनुभवी संगीत शिक्षक व्यक्त करीत आहेत. गायन, वादन कलेतील संगीत शिक्षणाच्या ऑनलाईन शिकवणीचा प्रयोग करत आहेत. मात्र, त्यातूनही फारसे काहीच हाती लागत नाही. काहीजण सोशल मीडियावर व्हिडिओचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवित आहेत. कोरोनामुळे शेकडो संगीततज्ज्ञ व शिक्षक यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळेल ते काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. काहीजण अगदी मजुरीही करू लागले आहेत.

या क्षेत्रातील बहुतेक कलाकार विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली कला पेश करीत असतात. त्यातून त्यांना मानधनाच्या रूपाने काही प्रमाणात बिदागी मिळते. मात्र, वर्षभरापासून असे कार्यक्रम बंद असल्याने तोही मार्ग बंद झाल्याची खंत अनेक कलाकारांसह भजनसम्राट भाऊसाहेब धावडे महाराज यांनी व्यक्त केली.

---

संगीत क्षेत्रात काम करणाऱ्यांनी खचून न जाता आपले कार्य विविध माध्यमातून चालूच ठेवावे. कठीण प्रसंगात सामाजिक संस्थांनी हातभार लावणे गरजेचे आहे. संगीत क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आर्थिक समस्यांवर शासन योग्य निर्णय घेईल.

-रेवन्नाथ भनगडे,

संगीत अलंकार

---

सध्याच्या परिस्थितीत हवालदिल न होता संगीत मार्गदर्शकांनी सोशल मीडियाचा आधार घ्यावा आणि विद्यार्थी घडविण्याचे काम सुरूच ठेवावे. सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने आर्थिक संकट नक्कीच आहे. परंतु, हे दिवस निघून जातील.

-मकरंद खंरवडीकर,

संगीत अलंकार

=---

लोककला, शास्त्रीय, भजन, वारकरी संप्रदायावर या कोरोना काळात मोठे संकट कोसळले आहे. दीड वर्षापासून कला उत्सव बंद आहेत. त्यामुळे कलाकारांवर आर्थिक संकट आहे. शासनाने वेळीच ठोस निर्णय घ्यायला हवा.

-बाळासाहेब वाईकर,

संगीत प्राध्यापक, न्यू आर्टस काॅलेज, नगर

---

कला जोपासण्याची इच्छा असूनही विद्यार्थ्यांशी संपर्क तुटला आहे. उपजीविकेची दुसरी कला अवगत नसल्याने कलाकारांचे हाल होत आहेत. धूत संस्थेने ज्या पद्धतीने कलाकारांना मदत केली तशी समाजातून मदत झाली पाहिजे.

-अच्युत सुतार,

ज्येष्ठ तबला वादक

---

चार पासपोर्ट फोटो

Web Title: Unemployment ax on music teachers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.