पाण्यासाठी सरकारला भीक मागावी लागते, हे दुर्दैव : मानसी नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 01:19 PM2019-08-11T13:19:53+5:302019-08-11T13:22:05+5:30
पाण्यासाठी सरकारला भीक मागावी लागते. यासारखे दुसरे दुर्दैव काय कमर्शियल फायदा घ्यायचा किंवा फेमस होण्यासाठी येथे आलेले नाही.
योगेश गुंड
अहमदनगर : एखाद्या कलाकाराने सामाजिक प्रश्नांसाठी केलेले उपोषण किंवा आंदोलन हे काही सिनेमाचे शुटिंग नसते. त्याच्यातील माणुसकी दाखवण्यासाठी तो सामाजिक लढ्यात सहभागी होऊन सरकारशी भांडत असतो. मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असते हे संतापजनक आहे. टीक टॉकवर ग्रामीण ढंग फारच फेमस होत आहेत. मात्र ग्रामीण भागातील पाणी टंचाईसारख्या समस्या का फेमस होत नाहीत? असा सवाल अभिनेत्री मानसी नाईक यांनी उपस्थित केला.
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी साकळाई जलसिंचन योजनेच्या मंजुरीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी मानसी नाईक नगरला आल्या होत्या. त्यावेळी तिच्याशी झालेली बातचीत अशी.
उपोषणाला पाठिंबा देण्यामागची भूमिका काय ?
मी टाळ्या घेण्यासाठी येथे आले नाही. दीपाली माझी सावली आहे. पाण्यासाठी सरकारला भीक मागावी लागते. यासारखे दुसरे दुर्दैव काय कमर्शियल फायदा घ्यायचा किंवा फेमस होण्यासाठी येथे आलेले नाही.
ग्रामीण भागातील प्रश्नाविषयी आपले मत काय?
सध्या टीक टॉकवर ग्रामीण भाग जोरात आहे. अस्सल ग्रामीण भाषेतील व्हिडिओ लवकर फेमस होतात. मग टीक टॉकमधून ग्रामीण भागातील समस्या का दाखवल्या जात नाहीत?
सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केले का?
सरकारला वाटते दीपालीला निवडणुकीत उभे राहायचे आहे. म्हणून तिच्या उपोषणाकडे दुर्लक्ष होत आहे. पण हा काही सिनेमातील सीन नाही. कोणीही आमरण उपोषण करून दाखवावे माझे चॅलेंज आहे. हे सोपे काम नाही. सरकारचा एकही प्रतिनिधी उपोषण थांबवण्यासाठी पुढे येत नाही.
चाहत्यांना काय संदेश द्याल?
कलाकारांचे आंदोलन हे काय सिनेमातील शुटिंग नसते. नुसते येऊन पाहू नका. त्यास पाठिंबा द्या. काहीजण फक्त नटी आहे म्हणून पाहतात व निघून जातात. हे योग्य नाही यास सर्वांचा पाठिंबा मिळायला हवा. फक्त सेल्फी व पोस्ट टाकू नका.
तुमचा पाणी टंचाईशी संबंध आला का?
मी पुण्या, मुंबईत वाढले आहे. अस्सल पुणेकर आहे. लहानपणापासून लाडात वाढली असल्याने पाण्यावाचून ग्रामीण भाग कसा तळमळतो हे पहिल्यांदा पाहत आहे. मुंबई पुण्यात माणुसकी हरवत चालली आहे. खरी माणुसकी ग्रामीण भागात पाहायला मिळते.
टीक टॉकवर ग्रामीण ढंग फारच फेमस होत आहेत. मात्र पाणी टंचाईसारख्या समस्या का फेमस होत नाहीत? - मानसी नाईक