दुर्दैवी घटना; शोष खड्ड्यात पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 09:25 AM2021-12-19T09:25:38+5:302021-12-19T09:31:33+5:30
घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहुली येथील हॉटेल निलायमने सांडपाणी मुरवण्यासाठी पुढील बाजूस शोषखड्डा मारला आहे. खड्ड्यालगत पाणी उडविणारे कारंजे आहेत.
घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील माहुली येथील नाशिक-पुणे महामार्गालगत हॉटेल निलायम समोर असलेल्या शोषखड्ड्यात पडून साडे पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दानवी उर्फ परी दर्शन मंचरे (वय ५.५ वर्षे, रा. गणेश नगर, सप्तश्रृंगी मंदिरासमोर, अकोले बायपास रोड संगमनेर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहुली येथील हॉटेल निलायमने सांडपाणी मुरवण्यासाठी पुढील बाजूस शोषखड्डा मारला आहे. खड्ड्यालगत पाणी उडविणारे कारंजे आहेत.
दर्शन तात्यासाहेब मंचरे व त्यांची मुलगी परी उर्फ दानवी मंचरे (रा. गणेश नगर, सप्तश्रृंगी मंदिरासमोर, अकोले बायपास रोड संगमनेर) हे रविंद्र बाबासाहेब लेंडे (रा.खंदरमाळवाडी ता. संगमनेर) यांच्याकडे कामानिमित्त आले होते ते घरी परतत असताना हॉटेल निलायम येथे थांबले होते. हॉटेल निलायम लगतच्या हॉटेल समोर एका बसने अचानक पेट घेतल्याने दोघांचेही लक्ष त्या बसकडे गेले. त्याच दरम्यान परी खेळत खेळत समोरील कारंजाकडे गेली. खेळत असताना परी अचानक कारंजालगत असलेल्या खड्ड्यात पडली. मुलीचे वडील दर्शन मंचरे व मामा रवींद्र लेंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केला.
दरम्यान, आजुबाजुचे नागरीक जमा झाले. खड्ड्यातून परीला बाहेर काढत तात्काळ १९ मैल येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करत परीला मृत घोषीत केले. घटनेची माहीती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ वायळ ,पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुगणवाहीकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. रामनाथ बाबासाहेब लेंडे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहेत.