साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविला विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:38 PM2019-08-02T12:38:59+5:302019-08-02T13:23:54+5:30
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास साडेपाच लाख शेतकऱ्यांनी 3 लाख 59 हजार 992 हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे.
गोरख देवकर
अहमदनगर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास साडेपाच लाख शेतकऱ्यांनी 3 लाख 59 हजार 992 हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे. तांत्रिक अडचणींमुळे पीकविमा भरण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढविली होती. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दीडपट अधिक शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 5 लाख 68 हजार 375 शेतक-यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पीक विमा उतरविला आहे. विमाहप्त्यापोटी 22 कोटी 82 लाख रूपये भरले आहेत. गतवर्षी साडेतीन लाख शेतक-यांनी पीक विमा भरला होता़ त्या तुलनेत यंदा शेतक-यांची दीडपट अधिक संख्या आहे.
जिल्ह्यात यंदा भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोटात पाऊस आहे. मात्र लाभक्षेत्रात पावसाने दांडी मारली आहे. बहुतांश भागात पेरलेले अद्यापपर्यंत उगवलेले नाही.
2014-15
1 लाख 40 हजार 154 शेतक-यांनी 3 कोटी 92 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. त्यांना 22.07 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.
2015-16
3 लाख 77 हजार 217 शेतक-यांनी 10 कोटी 57 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. शेतक-यांना 120.62 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.
2016-17
4 लाख 29 हजार 150 शेतक-यांनी 21 कोटी 53 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. शेतक-यांना 83.23 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.
2017-18
2 लाख 52 हजार 896 शेतक-यांनी 22 कोटी 4 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. केवळ 20.87 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.
2018-19
7 लाख 65 हजार 505 शेतक-यांनी 47 कोटी 9 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. शेतक-यांना 90.79 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.
विमा संरक्षण कोणाला?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतक-यांना विमा संरक्षण मिळणार.
24 जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम मुदत होती. पण, यासाठी येणा-या तांत्रिक अडचणी, पोर्टलमध्ये वारंवार उद्भवणा-या त्रुटी आणि बँकानी पीक विमा भरून घेण्यास होत असलेला विलंब यामुळे सेतु सुविधा केंद्रावर होणारी शेतक-यांची गर्दी लक्षात घेऊन 31 जुलैपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली.
विमा हप्ता किती?
खरीप हंगामातील पिकांसाठी शेतक-यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के तर नगदी पिकांकरिता 5 टक्के हप्ता शेतक-यांना भरावा लागणार आहे.
5.68 लाख शेतक-यांनी यंदा जिल्ह्यातील 3 लाख 59 हजार 692 हेक्टरवरील विविध पिकांचा विमा उतरविला