केंद्रीय मंत्री राणे यांनी महाराष्ट्राचा अवमान केला : वहाडणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:13+5:302021-08-25T04:26:13+5:30
कोपरगाव : केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अतिशय बेताल वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राचाच अवमान केलेला ...
कोपरगाव : केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अतिशय बेताल वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राचाच अवमान केलेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारी मंत्र्यांना जनसंपर्क यात्रा काढण्याच्या सूचना दिल्या. केंद्र शासनाच्या योजना-धोरणे याबाबत जनजागृती करायला सांगितले. परंतु मंत्री नारायण राणे यांनी कुठलेही भान न ठेवता मुख्यमंत्री पदाचा अवमान तर केलाच पण भाजपालाही मान खाली घालायला लावली आहे, अशी प्रतिक्रिया कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली आहे.
वहाडणे म्हणाले, बाहेरून आणून पक्षाच्या मानगुटीवर बसविलेल्या नेत्यांवर भाजपचे नियंत्रण राहू शकत नाही. असे आयाराम स्वतःच्याच सोयीने वागणार-बोलणार यात शंकाच नाही. कानाखाली मारण्याची भाषा करून फार लोकप्रियता मिळेल, या भ्रमात राणे यांनी राहू नये नाही. अशी भाषा वापरून राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. खरे तर उंचीपेक्षा जास्त मोठे पद मिळले तर काहीजण हवेत तरंगतात. कुणी कोणत्याही पक्षाचे काम करा पण नाहक एकमेकांतील वैरभाव वाढवून राज्यातील राजकारण कलुषित करू नये. राजकारणात कोण कुणाच्या कधी गळ्यात गळे घालतील हे सांगताच येत नाही हे माहीत असूनही भंपक वक्तव्य करणे निषेधार्ह आहे.