एकाच वेळी २२ पिके घेण्याचा अनोखा प्रयोग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:44 PM2018-07-06T12:44:20+5:302018-07-06T12:44:54+5:30
पाथर्डी तालुक्यातील करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भट्टीवाडीतील छानराज क्षेत्रे या शेतकऱ्याने सेंद्रिय शेती करून एकाच वेळी विविध २२ पिके घेण्याचे अनोखे धाडस करून वेगळा आदर्श शेतक-यांपुढे ठेवला आहे.
अशोक मोरे
पाथर्डी तालुक्यातील करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भट्टीवाडीतील छानराज क्षेत्रे या शेतकऱ्याने सेंद्रिय शेती करून एकाच वेळी विविध २२ पिके घेण्याचे अनोखे धाडस करून वेगळा आदर्श शेतक-यांपुढे ठेवला आहे.
पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. गर्भगिरी डोंगराच्या कुशीत अनेक लहान-मोठी गावे, वाडया, वस्त्या वसलेल्या आहेत. या भागात पाण्याचे, पावसाचे प्रमाण नेहमीच कमी असल्याने या भागातील शेतकºयांना एखादे पीक हाती लागेल की नाही याची शाश्वती नसते. परंतु कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर या भागातील शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत. भट्टीवाडीतील छानराज क्षेत्रे या शेतकºयाने सेंद्रिय शेती करून एकाच वेळी २२ पिके घेण्याचे अनोखे धाडस करून वेगळा आदर्श शेतकºयांपुढे ठेवला आहे. त्यांच्या या शेतीला नुकतीच तामिळनाडू येथील नैसर्गिक शेतीतज्ज्ञ वेद्री सेलवन, सोशल सेंटरचे डॉ. जिवेंद्र जाधव व त्यांच्या सहकाºयांनी भेट दिली. त्यावेळी परिसरातील व भट्टीवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छानराज क्षेत्रे म्हणाले, डाळिंब, शेवगा, मिरची, ग्लिरिसीडिया, हळद, हदगा, बाजरी, आंबा, पपई, दुधी भोपळा, वाटाणा, केळी, मका, झेंडू, अननस, बटाटा, उडीद, ज्वारी, पेरू, करंज, एरंड, चारा गवत आदी पिकाची एकाच क्षेत्रात लागवड केली आहे. यास रेन रोस पाईपद्वारे पाणी देण्याची सोय केली आहे. या पध्दतीमुळे पावसाप्रमाणे पिकास पाणी मिळून सर्व झाडे व पिके यांचा रोगापासून बचाव होतो. सोशल सेंटर अहमदनगर पुरस्कृत, अनुदानित, दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरण बदल, स्थलांतर व अन्नसुरक्षा प्रकल्पांतर्गत स्वामी व्हित्री चलन यांच्या मार्गदर्शनाखाली पाच थरांची शेती, प्राचीन पीक तत्वावर वरील पिकांची एकाच क्षेत्रात एकाचवेळी लागवड करण्यात आली असल्याची माहितीही छानराज क्षेत्रे यांनी दिली. या भागातील अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करीत असल्याने या भागातील शेतीस अनेक मान्यवर, सेलिब्रेटी, शेतीतज्ज्ञ या भागातील शेती पाहण्यासाठी भेटी देत आहेत. या भागात अनेक शेतकरी आता सेंद्रिय शेती करू लागले असून, शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत.
या शेतीने अनेक सेलिब्रिटी, शेतीतज्ज्ञांना जणू भुरळच घातली असल्याने ते भेटी देत आहेत, असे प्रगतशील शेतकरी छानराज क्षेत्रे यांनी सांगितले.