विद्यापीठाच्या क्रेडिट, टक्केवारीच्या खेळात विद्यार्थी ‘फेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 11:10 AM2018-07-14T11:10:33+5:302018-07-14T11:10:51+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रेडिट की टक्केवारी या घोळात नगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांवर नापास होण्याची वेळ ओढावली आहे.
अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रेडिट की टक्केवारी या घोळात नगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांवर नापास होण्याची वेळ ओढावली आहे. विद्यापीठाने तृतीय वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा टक्केवारी पद्धतीने घेऊन निकाल के्रडिट पद्धतीने जाहीर केला. तर द्वितीय सत्राची परीक्षा सुरु झाल्यानंतर पाच
दिवसांनी विद्यापीठाने पुन्हा टक्केवारी पद्धत लागू केली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसला
आहे़
विद्यापीठाने २०१७ मध्ये तृतीय वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा घेतली. त्यावेळी ही परीक्षा टक्केवारी पध्दतीने होणार असल्याचे सांगितले. निकालही टक्केवारीनुसारच जाहीर करण्याचे परिपत्रकही काढले. मात्र विद्यापीठाने क्रेडिट सिस्टिमनुसार निकाल जाहीर केला. त्यानंतर मे- २०१८ मध्ये व्दितीय सत्राची परीक्षा झाली.
यामध्ये परीक्षा सुरु होऊन पाच दिवस झाल्यानंतर विद्यापीठाने अचानक टक्केवारी पद्धत लागू करण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढले. मात्र विद्यार्थ्यांनी अगोदरची क्रेडिट पद्धती गृहित धरुन पेपर सोडविले़ विद्यापीठाने टक्केवारी पद्धतीनुसार निकाल जाहीर केला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर तीनपेक्षा जास्त विषयात नापास होण्याची वेळ आली. तीनपेक्षा जास्त विषयात नापास झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात आता प्रवेश मिळणार नाही़ त्यामुळे विद्यापीठाने सर्वच निकाल क्रे डिट पध्दतीने जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली आहे.
क्रेडिट व टक्केवारी पद्धतीमधील फरक
के्रडिट सिस्टिममध्ये पास होण्याची संधी जास्त असते. के्रडिट सिस्टिममध्ये तुम्ही किती विषयांत नापास झाला हे पाहिले जात नाही, तर सर्व विषयांत २५ पेक्षा जास्त के्रडिट असेल तर पुढील वर्गात प्रवेश मिळतो. त्यामुळे क्रेडिट सिस्टिम विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. टक्केवारी पद्धतीत १०० पैकी ४० टक्के गुण व तीन विषयांत उत्तीर्ण असाल तरच पुढील वर्गात प्रवेश मिळतो.
विद्यापीठाच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने निर्णय बदलून सर्वच निकाल क्रेडिट सिस्टिमने जाहीर करावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
-धीरज कुमटकर, विद्यार्थी
विद्यापीठाने परीक्षा सुरु असताना अचानकपणे निर्णय कळविला. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले. या निर्णयामुळे नक्कीच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे विद्यापीठाला कळविले असून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. - डॉ. राजकुमार देशपांडे, प्राचार्य, छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती