नगरच्या विद्यापीठ उपकेंद्रास मान्यता

By Admin | Published: August 8, 2014 11:31 PM2014-08-08T23:31:41+5:302014-08-09T00:19:47+5:30

श्रीरामपूर : पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्राच्या आराखड्यास प्रशासकीय मंजुरी दिली

University sub-center recognition of the city | नगरच्या विद्यापीठ उपकेंद्रास मान्यता

नगरच्या विद्यापीठ उपकेंद्रास मान्यता

श्रीरामपूर : पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राच्या २२२ कोटींच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती विद्यापीठ अधिसभा सदस्य राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.
राज्य सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे बाबुर्डी घुमट येथील विद्यापीठ उपकेंद्राच्या कामाला गती मिळणार आहे. उपकेंद्राच्या या कामाबद्दल जिल्ह्यातील विद्यापीठ अधिसभा सदस्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. उपकेंद्रामुळे अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कामासाठी पुणे येथे जाण्याची गरज भासणार नाही, त्यांच्या वेळ आणि पैशाची बचत होईल, तसेच विद्यापीठ दर्जाचे शिक्षण अहमदनगर येथेच उपलब्ध होईल.
मागील महिन्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगनराव भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व विद्यापीठ अधिसभा सदस्यांची मुंबई येथे बैठक झाली होती. या बैठकीत राजेश टोपे यांनी उपकेंद्रांच्या विकास आराखड्याला अंतिम मंजुरीसह प्रशासकीय मंजुरी देण्यासाठीची कार्यवाही करण्याच्या सूचना सचिवांना दिल्या होत्या. त्यानुसारच या प्रस्तावास नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वाक्षरी करून ही फाईल मंजुरीसाठी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे पाठविली होती.
शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे उपकेंद्रामधील मुख्य प्रशासकीय इमारतीसह कला, वाणिज्य, औषधनिर्माण, व्यवस्थापन, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाबरोबरच मुला-मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, माहिती केंद्र, ग्रंथालय, कर्मचारी निवास, क्रीडा संकुल, अतिथीगृह अशा विविध इमारतींच्या कामाला गती देणार असल्याचे राजेंद्र विखे पाटील यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: University sub-center recognition of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.