महापालिकेचे बेकायदेशीर विषय रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:27 PM2018-07-17T12:27:26+5:302018-07-17T12:28:09+5:30
स्थायी समितीच्या कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांना मंजुरी दिल्यानंतर त्यासोबत ‘तसेच’ हा शब्द जोडून इतर विषय मंजूर ठरावात बेकायदेशीरपणे घुसडले जातात.
अहमदनगर : स्थायी समितीच्या कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांना मंजुरी दिल्यानंतर त्यासोबत ‘तसेच’ हा शब्द जोडून इतर विषय मंजूर ठरावात बेकायदेशीरपणे घुसडले जातात. त्यामुळे सदरचे विषय बेकायदेशीरपणे मंजूर होऊन त्याची प्रत्यक्ष कार्यवाही होते. यामध्ये पदाधिकाऱ्यांकडून मोठा व्यवहार होतो, तर महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. अशा बेकायदेशीरपणे मंजूर केलेल्या विषयांची आधी चौकशी करून नंतर ते रद्द करणार असल्याची ग्वाही स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली.
महापालिकेच्या स्थायी समितीची सोमवारी दुपारी एक वाजता सभा झाली. सभेमध्ये तब्बल २० विषय मंजुरीसाठी होते. यामध्ये २९ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय होता. यावर विरोधी पक्षनेते तथा स्थायी समितीचे सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी इतिवृत्त मंजुरीस आक्षेप घेतला.
कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांवर चर्चा करून ते मंजूर केले जातात. त्या विषयांना जोडून काही विषय बेकायदेशीरपणे मंजूर झालेल्या ठरावात घुसडले जातात. असे विषय तत्काळ रद्द करण्याची मागणी बोराटे यांनी लावून धरली. २०१७ मध्ये स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव होत्या. त्यांचा सगळा रोख जाधव यांच्या दिशेने होता. यावेळी बोराटे यांनी बेकायदेशीरपणे घुसडलेल्या विषयांचे सभागृहात वाचन केले. त्यामध्ये चंद्रमा महिला स्वयंसहायता बचत गटाला सिद्धीबागेत मत्स्यालय, फुलराणी पाच वर्षे खासगी तत्त्वावर चालविण्यास देणे, २०१७-१८ मध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यास बेकायदेशीर मुदतवाढ देणे, प्रोग्रेसिव्ह या शैक्षणिक संस्थेला आठ खोल्या ११ वर्षांच्या भाडेतत्त्वावर देणे, मातोश्री प्रतिष्ठान यांना व्यवसायासाठी अग्निशमन दलाशेजारील जागा भाडेतत्त्वावर देणे आदी विषय होते. यासह आणखी काही विषय ठरावात घुसडण्यात आले होते.
सदरचे विषय तत्काळ रद्द करा, ठराव विखंडित करण्याची मागणी बोराटे यांनी लावून धरली. मात्र याबाबत चौकशी करून नंतर कार्यवाही करण्याचे आश्वासन सभापती वाकळे यांनी दिले.
बेकायदेशीर विषय शासनाकडे
स्थायी समिती, सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तामध्ये कार्यक्रमपत्रिकेवर नसलेल्या विषयांना मंजुरी देण्यात आली असेल तर असे विषय राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. बेकायदेशीर ठराव शासनाकडूनच विखंडित करण्यात येणार आहेत. स्थायी समितीमध्ये मंजूर झालेले बेकायदेशीर विषय शासनाकडे पाठविले जातील, असे नगरसचिव एस. बी. तडवी यांनी सभागृहाला सांगितले. अशा बेकायदेशीर विषयांबाबत शासनाकडे चौकशी सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
नलावडे यांनी दिले बल्ब भेट
नगरसेविकांनी मागणी केल्यानुसार पथदिवे दुरुस्त केले जातात. स्टोअर विभागातून नवे दिवे घेतले जातात, प्रत्यक्षात जुने दिवे बसविले जातात. एक दोन दिवसांत ते बंद पडतात. त्यामुळे आता आम्हीच इलेक्ट्रील मटेरिअल देतो, तुम्ही किमान कामे तरी करा, हे सांगण्यासाठी भाजप नगरसेविका उषाताई नलावडे यांनी विद्युत विभागाच्या अधिकाºयाला चक्क नवा बल्ब भेट देऊन स्थायी समितीच्या सभेत गांधीगिरी केली. दरम्यान विद्युत विभागात मोठ्या प्रमाणावर घोटाळा सुरूच असल्याचा आरोप नलावडे यांनी केला. तर विद्युत विभागात काम न करणाºया वायरमनला कामावरून काढून टाकण्याचा आदेश सभापती वाकळे यांनी दिला. दरम्यान कामचुकार कर्मचाºयांना नोटिसा बजावल्याचे विद्युत विभाग प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.
असे झाले निर्णय...........
श्वान पकडण्याचा वेग वाढविणार
मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई
उद्यानप्रमुख उद्धव म्हसे यांना समज
२३ उद्याने विकसित करण्यास मंजुरी
खतनिर्मिती व इंधननिर्मिती प्रकल्पास मान्यता
१४५० रुपये प्रतिटन खतविक्रीस मंजुरी
स्वच्छता आराखड्याबाबत पाठपुरावा करणार
अमृत योजनेतील सौरप्रकल्प मार्गी लावणार