बेलापुरातील बिनविरोधाचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:18 AM2021-01-04T04:18:15+5:302021-01-04T04:18:15+5:30
गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथ्था, भास्करराव खंडागळे, देवीदास देसाई आदींनी बिनविरोधासाठी सर्वपक्षीय नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवला होता. त्याकरिता दोन वेळा ...
गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथ्था, भास्करराव खंडागळे, देवीदास देसाई आदींनी बिनविरोधासाठी सर्वपक्षीय नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवला होता. त्याकरिता दोन वेळा बैठक बोलवून निवडणूक टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, निवडणुकीसाठी ८३ उमेदवारांनी अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक होणार, हे निश्चित झाले.
अखेरचा प्रयत्न म्हणून शुक्रवारी गावात बैठक बोलविण्यात आली. त्यात अर्ज माघारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यात अनेक इच्छुकांनी माघारीसाठी सहमती दर्शविली होती. मात्र, अरुण नाईक हे बैठकीला गैरहजर होते. त्यांनी आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी ही निवडणूक लढविली जाईल, असे स्पष्ट केले. पक्ष संघटना गावोगावी बळकट करण्याचा प्रयत्न आहे. पक्षाच्या धोरणामुळे वेगळा निर्णय घेता येणार नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, बिनविरोधाच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने आपापल्या भूमिकेनुसार राजकीय निर्णय घ्यावे, असे म्हटले आहे. बिनविरोधाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले आहेत.
-----------