बिनविरोध निवडून आल्या ‘सौ’ सत्कार मात्र ‘यजमानांचा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:38+5:302021-01-10T04:15:38+5:30
भेंडा : नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रूक ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या ‘सौं’च्या (महिला) ऐवजी त्यांचे यजमान (पती) यांचाच गावात बोलबाला ...
भेंडा : नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रूक ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या ‘सौं’च्या (महिला) ऐवजी त्यांचे यजमान (पती) यांचाच गावात बोलबाला सुरू आहे. ‘सौं’ऐवजी त्यांच्या यजमानांचा ठिकठिकाणी सत्कार होत असून, सोशल मीडियावरही त्यांनाच शुभेच्छा दिल्या जात आहेत.
भेंडा ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी १३ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. यात ९ महिलांचा समावेश आहे. बिनविरोध निवडलेल्या त्या महिलांऐवजी त्यांच्या यजमानांचे अभिनंदन व सत्कार सामाजिक प्रसार माध्यमांवर चालू आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमात आहेत. निवड नेमकी कोणाची झाली? हा प्रश्न नागरिकांना पडला.
निवडणूक रिंगणात आणखी दोन महिला आहेत. एकूण ११ महिला सदस्य राहतील. त्यामुळे निवडणुकीनंतर सत्तेची दोरी महिलांच्या हातात राहील की फक्त त्यांना सदस्य/सरपंच होण्याचा मान मिळेल आणि प्रत्यक्ष अधिकार त्यांचे पतीच वापरतील, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. येथे सर्वाधिक महिला निवडून येणार आहेत. त्यामुळे येथे खऱ्या अर्थाने महिलांच्या हाती कारभार असायला हवी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
तसेही काही ठिकाणी पत्नी एखाद्या पदावर असताना त्यांच्या पतींचाच विविध कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायत सदस्य, सरपंच असा उल्लेख केला जातो. तरीही कोणीच त्याबाबत आक्षेप घेत नाही. ही बाब शोचनीय आहे.