अहमदनगर शहरात अभूतपूर्व शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:37 PM2020-03-22T12:37:32+5:302020-03-22T12:38:02+5:30
अहमदनगर शहरामध्ये सकाळी सातपासूनच अभूतपूर्व शांतता पसरली आहे. दिवस उजाडला तरी माणसांची धावाधाव नव्हती की वाहनांचे आवाजही येत नव्हते. रस्ते अगदी निर्मनुष्य होते. एकही वाहन येताना किंवा जाताना दिसले नाही.
अहमदनगर : शहरामध्ये सकाळी सातपासूनच अभूतपूर्व शांतता पसरली आहे. दिवस उजाडला तरी माणसांची धावाधाव नव्हती की वाहनांचे आवाजही येत नव्हते. रस्ते अगदी निर्मनुष्य होते. एकही वाहन येताना किंवा जाताना दिसले नाही. काही अंतरावर ठरावीक पोलीस मात्र कर्तव्य बजावताना दिसत आहेत. सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पसरलेला आहे. सकाळी सातपासून दुपारपर्यंत ही शांतता कायम आहे.
शहरात सर्वात जास्त वर्दळ असलेले औरंगाबाद रोड, नगर-मनमाड रोड, दिल्लीगेट, वाडिया पार्क, बसस्थानक परिसरातमध्ये एकही व्यक्ती रस्त्यावर आढळून आलेला नाही. कोरोनाविरोधातील या लढाईत सर्व नगरकर एकाच जागेवर घरात बसून आहेत. घरामध्ये प्रथमच कुटुंबियांसोबत एकत्र नांदत आहेत. रस्त्यावर फक्त पोलीस दिसत आहेत. कोणी दिसला तर त्याला ते परत घरी पाठवित आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवर शांतता पसरली आहे. दुकाने, हॉटेल, पान टपºया, चहाचे स्टॉल तर दोन दिवसांपासून नगरमध्ये बंद आहेत. मात्र रस्त्यावर दिसणारे वाहने मात्र कुठेच दिसेनाशी झाली आहेत. सर्वत्र शांतता पसरलेली आहे. सकाळी ‘लोकमत’ने दिल्लीगेट, पाईपलाईन, बसस्थानक परिसराचा आढावा घेतला असता एकाही ठिकाणी माणूस आढळून आलेला नाही. कुठेही कसलाही आवाज नाही.