साईनगरीत अभूतपूर्व सन्नाटा; शिर्डीचा श्वास थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 02:42 PM2020-03-22T14:42:04+5:302020-03-22T14:42:16+5:30

चोवीस तास सुरू असलेले गाव अशी ओळख असलेल्या साईनगरीत रविवारी (दि.२२ मार्च) जनता संचारबंदीच्या निमित्ताने अभुतपूर्व सन्नाटा अनुभवायला मिळाला. सतत गजबजलेला परिसर बघण्याची सवय झालेल्या डोळ्यांना आजची शिर्डी स्वप्नवत व अविश्वसनीय भासत होती.

Unprecedented silence in Psyngar; Shirdi's breathing stopped | साईनगरीत अभूतपूर्व सन्नाटा; शिर्डीचा श्वास थांबला

साईनगरीत अभूतपूर्व सन्नाटा; शिर्डीचा श्वास थांबला

शिर्डी : चोवीस तास सुरू असलेले गाव अशी ओळख असलेल्या साईनगरीत रविवारी (दि.२२ मार्च) जनता संचारबंदीच्या निमित्ताने अभुतपूर्व सन्नाटा अनुभवायला मिळाला. सतत गजबजलेला परिसर बघण्याची सवय झालेल्या डोळ्यांना आजची शिर्डी स्वप्नवत व अविश्वसनीय भासत होती.
वर्षाकाठी तीन कोटी तर रोज लाखभर भाविकांची वर्दळ असलेल्या शिर्डीतील रस्ते रविवारी निर्मनुष्य झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला शिर्डीत ना भुतो, ना भविष्यती.. असा प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून शिर्डीतील साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनानेही दोन दिवसांपासून शहरातील उद्योग, व्यवसायही बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शिर्डीतील रस्त्यांनी, गल्ली-बोळांनी अगोदरच मोकळा श्वास घेतला होता. आजच्या जनता कर्फ्यूने मात्र चोवीस तास जीवंतपणा अनुभवणा-या संपूर्ण शहराचा श्वासच थांबलेला दिसला.
दिवस-रात्र भाविकांच्या व वाहनांच्या गर्दीने ओसंडून वाहणा-या रस्त्यावर चक्क शुकशुकाट झाला होता. मंदिर परिसरच नव्हे तर महामार्गावरही अभुतपूर्व शांतता अनुभवायला मिळाली. साईमंदिरातही केवळ पुजा-यांनी बाबांची आरती केली. एरव्ही भाविकांनी फुललेला मंदिर परिसर, साईनामाचा जयघोष करणारे अनेक भाविक, भाविकांच्या मागे लागलेले कमिशन एजंट, भिकारी, मंदिराच्या स्पीकरवरून गर्दीत हरवलेल्या व्यक्तींच्या नावांचा पुकारा, वाहनांचे हॉर्न, हातविक्री करणा-या मुलांची आरडाओरड, दुकानातील रेकॉर्ड, गर्दीतुनही प्रवासी गोळा करीत फिरणारी खासगी वाहने, पाण्याचे टँकर हे सर्व आज शिर्डीच्या कॅनव्हास वरून नाहीस झालेल होत़े.
साई मंदिरात घंटानाद
शिर्डीत रविवारी सायंकाळी साडेचार वाजता साईस्तवनमंजिरीचे घरोघरी एकाच वेळी पठण होणार आहे. संस्थानच्या स्पिकरवरही ते लावल जाणार आहेत. यानंतर पाच वाजता घरोघरी टाळ्या, थाळा, घंटा वाजवण्यात येणार आहे. तर साईमंदिरासह गावातील सर्वच मंदिरात घंटानाद करण्यात येणार आहे. संस्थानमध्ये सायरनही वाजवण्यात येणार आहे. सगळे शिर्डीकर साडेचार वाजण्याची प्रतीक्षा करीत आहेत. यानंतर कोरोनाचा प्रकोप शांत होत नाही तोपर्यंत शिर्डीत रोजच हा उपक्रम राबवला जाणार आहे.
 

Web Title: Unprecedented silence in Psyngar; Shirdi's breathing stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.