अवकाळी पावसाने २४ जनावरे दगावली; २५ घरांची पडझड
By चंद्रकांत शेळके | Published: November 27, 2023 06:08 PM2023-11-27T18:08:47+5:302023-11-27T18:09:26+5:30
ग्रामीण भागात काही नागरिकांच्या घरांचे किंवा जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले.
अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय राहुरी व संगमनेर तालुक्यात मेंढ्या, श्रीरामपूरमध्ये १ बैल, तर पारनेर तालुक्यात ५ हजार कोंबड्या दगावल्या. २५ ठिकाणी घरांचीही पडझड झाली. दरम्यान, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनास दिल्या आहेत.
जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटे अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली. यामुळे ग्रामीण भागात काही नागरिकांच्या घरांचे किंवा जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार पारनेर तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. १०० जनावरे जखमी झाले असून चार घरांची पडझड झाली आहे. शिवाय ५ हजार कोंबड्याही दगावल्या. संगमनेर तालुक्यात ४ मेंढ्या मयत झाल्या असून १० घरांची पडझड झाली आहे. राहुरी तालुक्यात १२ कोकरू, ६ मेंढ्या व १ शेळी मयत झाली, तर घरांची पडझड झाली. अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतही घरांची पडझड झाली. श्रीरामपूरमध्ये १ बैल दगावल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा करणार असून सद्य:स्थितीत स्थानिक अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या ठिकाणांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
आठ मंडळांत अतिवृष्टी
पारनेर तालुक्यातील निघोज ८२ मिमी, भातकुडगाव (ता. शेवगाव) ६९ मिमी, नेवाशातील सलाबतपूर ६९ मिमी, कुकाणा ६९ मिमी, देवळाली ७४, आश्वी ७२ मिमी, तळेगाव ७० मिमी, पोहेगाव ६६ या आठ मंडळांत अतिवृष्टी झाली. याशिवाय पळशी ६०, समनापूर ५०, पिंपरणे ६१, सात्रळ ६१, ताहाराबाद ५३, टाकळीमियाँ ५७ आदी ठिकाणीही अवकाळी पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
नगर - १५
पारनेर - ३९
श्रीगोंदा ६
कर्जत ३
जामखेड २
शेवगाव ४१
पाथर्डी २७
नेवासा ३५
राहुरी ४५
संगमनेर ५०
अकोले ४६
कोपरगाव ४४
श्रीरामपूर ४६
राहाता ४२