पालिकेच्या अनास्थेपायी गोठली रक्त विघटन प्रयोगशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 03:51 PM2019-06-14T15:51:38+5:302019-06-14T15:51:52+5:30
गोरगरिबांसाठी जीवनदायी ठरलेल्या कै ़ बाळासाहेब देशपांडे दवाखान्यातील रक्त विघटन प्रयोगशाळेचा प्रशासनातीलच काही अधिकाऱ्यांनी गळा घोटला आहे़
अण्णा नवथर
अहमदनगर : गोरगरिबांसाठी जीवनदायी ठरलेल्या कै ़ बाळासाहेब देशपांडे दवाखान्यातील रक्त विघटन प्रयोगशाळेचा प्रशासनातीलच काही अधिकाऱ्यांनी गळा घोटला आहे़ त्यामुळे महापालिकेच्या मूळ उद्देशाला नख लागले असून, लाखोंची मशिनरी दोन वर्षांनंतरही धूळखात पडून आहे़ परिणामी अवघ्या पाचशे रुपयांत मिळणाºया प्लाझमा, प्लेटलेट आणि पीआरसी, या रक्त पिशव्यांसाठी हजारो रुपये मोजावे लागत आहे़
अलीकडे आजारांचे प्रमाण वाढले आहे़ रक्ताची मोठ्याप्रमाणात गरज भासू लागली आहे़ ही गरज लक्षात घेता अनेक संस्था पुढे येत आहेत़ रक्ताचा थेंब अन थेंब अमोल आहे़ त्याची किंमत होऊ शकत नाही़ मात्र त्यावरील प्रक्रिया आणि रक्तदान शिबिरे, यामुळे त्याची किंमत रुग्णाला मोजावीच लागते़ पण गोरगरिबांकडे हजार पाचशे रुपयेही नसतात़ अशा रुग्णांना अत्यल्प दरात आवश्यक ते घटक असलेले रक्त मिळावे, यासाठी महापालिकेने ९५ लाख रुपयांच्या टी सोनिक कंपनीच्या तीन अत्याधुनिक मशिनरी २०१७ मध्ये खरेदी केल्या़ त्यापूर्वी २०१२ मध्ये सुमारे ४० लाख रुपये खर्चून रक्तपेढीचे नूतनीकरण के ले़ नूतनीकरण केलेल्या वास्तुत ही मशिनरी बसविण्यात आली़ त्याचा अहवाल अन्न औषध प्रशासनाला पाठविण्यात आला़ मशिनरीची चाचणी घेतली गेली, हे सर्व सोपस्कार पाडण्यात वर्ष निघून गेले़ सप्टेंबर २०१८ मध्ये रक्त विघटन प्रयोगशाळेला अधिकृत परवानगी मिळाली़ जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे थाटात उदघाटन झाले़ प्रयोगशाळा सुरू झाली़ पण, जानेवारी २०१९ मध्ये अन्न औषध प्रशासनाने प्रयोगशाळेला भेट दिली़ या भेटी दरम्यान अनुभवी कर्मचारी, डॉक्टर आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ त्यामुळे प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कर्मचारी भरतीची अट घातली़ मात्र सहा महिन्यांत पालिकेकडून याबाबत कुठलीही कार्यवाही केली गेली नाही़
रक्तपेढीचे दोनवेळा उदघाटन
रक्तपेढीच्या नूतनीकरणाचे २०१२ मध्ये हभप भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते तत्कालीन महापौर शीला शिंदे यांच्या उपस्थित उदघाटन करण्यात आले़ रक्तपेढीच्या भितींना फरशी बसविणे, एसी, विद्युत व्यवस्था आदी कामे करण्यात आली़ त्याचे उदघाटन झाले़ त्यानंतर याच वास्तुत बसविण्यात आलेल्या रक्त विघटन करणाºया मशिनरींचे जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते उदघाटन व लोकार्पण करण्यात आले़ दोनवेळा उदघाटन झालेली रक्तपेढी आज शेवटच्या घटका मोजत आहे़
रक्तपेढीचा परवाना होऊ शकतो रद्द
रक्त विघटन प्रयोगशाळेत वर्षात किमान ५ हजार पिशव्यांच्या कलेक्शनची अट आहे़ यापेक्षा कमी कलेक्शन झाल्यास परवाना रद्द होऊ शकतो़ रक्तपेढीतील त्रुटींमुळे सध्याचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे निलंबित झाले होते़ ते पुन्हा कामावर हजर झाले़ परंतु, त्यांचे पुन्हा येथे दुर्लक्ष झाले असून, कर्मचाºयांची भरती न केल्याने परवाना रद्द होऊ शकतो़
काय आहे रक्त विघटन प्रक्रिया
सध्या सर्व रक्तपेढ्यांमध्ये शिबिरांव्दारे जमा झालेल्या रक्त पिशव्यांतील रक्ताचे विघटन केले जाते़ रक्तांचे विघटन केल्यानंतर प्लाझमा, प्लेटलेट आणि पीआरसी, अशा तीन प्रकारचे रक्त मिळते़
प्लाझमा हे विघटन केलेले रक्त भाजलेली व्यक्ती किंवा सर्पदंश झालेल्यांना दिले जाते़ प्लेटलेट डेंग्यूच्या रुग्णांना लागते़ पीआरसी हे शरिरात कमी रक्त असलेल्या व्यक्तींला दिले जाते.
रक्त विघटन प्रयोगशाळा सुरू करण्याची वेळोवेळी मागणी केली़ मात्र अधिकाºयांनी ती सुरू केली नाही़ ही प्रयोगशाळा सुरू न केल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल़ -बाळासाहेब बोराटे, नगरसेवक
रक्तपेढीतील पॅथॉलॉजीस्ट व टेक्निशियन यासह पदे रिक्त आहेत़ ही पदे भरण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे़ परंतु, अद्याप मंजुरी मिळाली नाही़ परवानगीनंतर पदे भरती करून प्रयोगशाळा सुरू करू़ -डॉ़ अनिल बोरगे, आरोग्य अधिकारी