निराधार माउलीची कॅन्सरची शस्त्रक्रिया यशस्वी : डॉ. सतीष सोनवणे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 03:39 PM2018-07-19T15:39:37+5:302018-07-19T18:28:52+5:30
जाणा-या - येणा-यांना दगडे मारायची. काही टवाळ पोरं तिच्या वेडसरपणाचा फायदा घेत तिला त्रास द्यायचे.
अहमदनगर : जाणा-या - येणा-यांना दगडे मारायची. काही टवाळ पोरं तिच्या वेडसरपणाचा फायदा घेत तिला त्रास द्यायचे. एका कार्यकर्त्याने तिला डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांच्या माउली संस्थेत दाखल केले. मात्र तिला स्तनाचा आजार असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मॅक्सकेअरच्या डॉ. सतीश सोनवणे यांनी तिला स्तनाच्या कॅन्सरपासून मुक्त करण्याची शपथ घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर तिच्यावरील कॅन्सरची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. डॉ. सोनवणे यांनी सर्व उपचार मोफत करुन सामाजिक बांधिलकी जपली.
एके दिवशी माउली संस्थेत एका कार्यकर्त्याने फोन करुन एका महिलेची माहिती दिली. त्यानंतर माउलीची टीम त्या ठिकाणी दाखल झाली. या महिलेला माउली संस्थेत दाखल करण्यात आले. तिच्या तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीमध्ये तिच्या डाव्या स्तनाला गाठ असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मॅक्सकेअर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे यांच्याकडे या महिलेस नेण्यात आले. त्यावेळी त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत विविध तपासण्या करण्याची गरज असल्याचे सांगितले. तपासण्या करण्यासाठी खर्चाची विचारणा डॉ. धामणे यांनी केली. मात्र खर्चाची जबाबदारी माझ्याकडे सोपवा, असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले. त्यामुळे धामणे दाम्पत्यानी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर पुढील प्रवास सुरु झाला.
प्रशासकीय अधिकारी जोसेफ पाटोळे, डायरेक्टर डॉ. राजेंद्र गायके यांनी तातडीने हालचाली करत सगळ््या तपासण्या सुरु केल्या. रेडिओलॉजिस्ट डॉ. सुशील नेमाने, फिजिशियन डॉ. अभिजित शिंदे यांनी तपासण्या केल्या. डायग्नोस्टिकचे डॉ. बाबा शिंदे यांनी तपासणी करुन हा कॅन्सर असल्याचे सांगितले. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला. वाढलेल्या कॅन्सरमुळे पूर्ण स्तनच काढून टाकण्याचे आॅपरेशन करावे लागणार होते. डॉ. सोनवणे यांनी सर्व तयारी केली. कायदेशीर जबाबदारी डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांनी घेतली. मॅक्सकेअर रुग्णालयात डॉ. सोनवणे व सहकाºयांनी गुंतागुंतीचे आॅपरेशन यशस्वीपणे पार पाडले.
शस्त्रक्रियेमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. पंकज वंजारे, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. पीयूष पाटील, रुग्णालयाचे संचालक डॉ. मोहम्मद माजीद, डॉ. प्रशांत पठारे, डॉ. आनंद काशीद, डॉ. सुदाम जरे, डॉ. निलेश परजणे, जनसंपर्क अधिकारी शैलेश सदावर्ते यांनी परिश्रम घेतले.
केमोथेरपी आणि रेडीओथेरपीच्या सर्व सुविधा मोफत देण्याची जबाबदारीही डॉ. सोनवणे यांनी घेतली. तिची काळजी घेण्यासाठी धामणे दाम्पत्य, त्यांचा मुलगा किरण, माउलीतील एक भगिनी, अहमदनगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. शरद बोरुडे, विजय साबळे, सागर लंके कष्ट घेत होते.