महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:25 AM2021-08-24T04:25:55+5:302021-08-24T04:25:55+5:30
महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी ...
महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील), राष्ट्रीय कृषी विकास योजनाअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ या वर्षासाठी अनुक्रमे ५ कोटी ५० लाख, ४ कोटी, १ कोटी ८० लाख एवढा निधी उपलब्ध आहे. योजनेअंतर्गत सिंचन विहीर, विहीर दुरुस्ती, पंपसंच, वीज जोडणी, पीव्हीसी पाइप, शेततळे अस्तरीकरण आदी बाबींचा लाभ देण्यात येतो.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या लाभार्थींची राज्यस्तरावर लॉटरी प्रक्रियामधून आज अखेर १९२२ लाभार्थींची निवड झालेली आहे. योजनेंतर्गत कामांची मंजुरी व कामांची अंमलबजावणी करण्यासाठी लाभार्थींनी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची छाननी व स्थळ पाहणीमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थीच्या अर्जास पूर्वसंमती दिल्यानंतर लाभार्थीना कामे सुरू करता येतील.
आज अखेर आतापर्यंत २७९ लाभार्थींनी कागदपत्रे अपलोड केली असून अद्याप ७०० लाभार्थींनी कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. योजनेंतर्गत कामांची अंमलबजावणी व अनुदान वितरण करण्यासाठी तत्काळ कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती काशीनाथ दाते, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, कृषी विकास अधिकारी शंकर किर्वे, जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र तागड यांनी केले आहे.