अप्पर पोलीस अधिक्षकांची हप्तेखोरीच्या चर्चेची क्लीप व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 02:09 PM2020-10-29T14:09:56+5:302020-10-29T14:18:18+5:30
अहमदनगर : एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले दत्ताराम राठोड व एक पोलीस कॉन्स्टेबल हप्तेखोरीबाबत चर्चा करत असल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
अहमदनगर : एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले दत्ताराम राठोड व एक पोलीस कॉन्स्टेबल हप्तेखोरीबाबत चर्चा करत असल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या क्लीपमध्ये राठोड हे स्वत:ला माल मिळेल का अशी विचारणा करत असून एका बाईनी जिल्ह्यात फार पैसे कमावले आहेत का असा प्रश्नही कॉन्स्टेबलला विचारत आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची बुधवारी रात्री बदली झाली. त्यांनी एक महिन्यापूर्वीच नगर जिल्ह्यात अप्पर अधिक्षकपदाचा पदभार घेतला होता. त्यामुळे अचानक बदली कशी झाली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांची व नेवासा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल गर्जे यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली? आहे.
--------------
या क्लीपचा सारांश थोडक्यात असा.
नेवासा पोलीस ठाण्यातील गर्जे नावाचे पोलीस कर्मचारी यांनी राठोड यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेमध्ये राठोड यांना भेटायला येण्याचे सांगत सगळे काही गोळा करून ठेवले आहे. कारवाई करायची गरज नाही. तुम्ही फक्त आदेश द्या. आपल्याकडे खूप मोठे बाऊन्सर आहेत. फक्त आपण सांगायचा उशिर आहे. आपला शब्द ते खाली पडू देत नाहीत. आम्ही व आमचे डेरे साहेब तुम्हाला भेटायला येतो. आल्यानंतर सविस्तर चर्चा करू, असे गर्जे सांगतात. त्यावर राठोड म्हणतात, तू सांगितले म्हणजे होईल का? त्यासाठी रेड टाकायला तिकडे यावे लागेल का?असा प्रश्न राठोड यांनी गर्जे यांना केला. त्यावर गर्जे म्हणतात, रेड टाकण्याची आवश्यकता नाही. सगळे काही तयार करून ठेवले आहे.
याबाबत राठोड यांची भूमिका जाणून घेण्यासाठी लोकमत’ने त्यांच्याशी तीनवेळा संपर्क केला. मात्र ते नंतर बोलू, असे म्हणाले.
----
उत्तरेत चांगले मार्केट दिसते
उत्तरेत (उत्तर नगर जिल्हा)चांगले मार्केट आहे. माझी बदली तिकडेच व्हायला हवी होती, असे राठोड यांनी सांगताच, गर्जे म्हणाले, साहेब तुम्ही तिकडे राहिले काय किंवा इकडे, काय फरक पडतो ? आम्ही तुम्हाला भेटायला येतोच. त्यावर राठोड म्हणतात, ह्यनुसताच येतो की माल घेऊन येतोह्ण. बाईने लय कमावले का? असाही प्रश्न राठोड करतात. त्यावर गर्जे म्हणतात, त्यांना प्रत्येक पोलीस ठाण्याकडून ५० लाख रुपयांचा हप्ता येतो. वैयक्तीक वसुली देखील मोठ्या प्रमाणावर आहे. नेवासा तालुक्यातील मोठ्या बियाणे उद्योजकाच्या नावाचाही या क्लीपमध्ये समावेश आहे. हा उद्योजक पोलिसांचा शब्द खाली पडू देत नाही, असे हा कॉन्स्टेबल सांगत आहे.