उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी शाळेत बसण्याचे फर्मान; नगरमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:54 PM2017-12-05T13:54:14+5:302017-12-05T14:03:39+5:30
जिल्ह्यातील तीन उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना बेधडक मराठी माध्यमात समायोजित करण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढल्याने शिक्षण विभागाचाही गोंधळ उडाला आहे. अकोल्यातील दुर्गम भागात रस्ताच नसल्याने दुस-या शाळेत मुलांना पाठवायचे कसे, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.
अण्णा नवथर
अहमदनगर : शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी अत्याल्प पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या समायोजनेत अनेक त्रुटी निर्माण झाल्याचे चित्र पुढे आले असून, जिल्ह्यातील तीन उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना बेधडक मराठी माध्यमात समायोजित करण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढल्याने शिक्षण विभागाचाही गोंधळ उडाला आहे. अकोल्यातील दुर्गम भागात रस्ताच नसल्याने दुस-या शाळेत मुलांना पाठवायचे कसे, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.
अत्याल्प पटसंख्येच्या जिल्ह्यातील ४९ शाळांना कायमचे कुलूप लागणार आहे़ शिक्षण विभागाच्या आदेशाची खातरजमा करता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही या शाळा बंद करण्याचे आदेश स्थानिक अधिका-यांना देऊन टाकले आहेत. प्रत्यक्षात समायोजन करताना दोन शाळांतील अंतर, शिक्षणाचे माध्यम, अस्तित्वात नसलेल्या शाळांचा संदर्भ, समायोजनासाठी सुचविलेल्या शाळांपेक्षा इतर शाळांचे अंतर कमी असणे, पर्यायी शाळेत जाण्यासाठी रस्त्यांचा अभाव, अशा व अन्य बाबी विद्यार्थ्यांच्या समायोजनात गोंधळ निर्माण करणा-या ठरत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
शिक्षण विभागाच्या आदेशाने जिल्ह्यातील ३८८ विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जवळच्या शाळेत जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या समायोजनेचे काम स्थानिक पातळीवर हाती घेण्यात आले आहे. समायोजनेत अनेक त्रुटी असल्याचे समोर येऊ लागल्याने शिक्षण विभागाचाच गोंधळ उडाला आहे.
शाळा बदल करताना एक किलोमीटरचे अंतर ठेवण्याची शिक्षणाचा अधिकरांतर्गत असलेली एक किलोमीटरची तरतूदही बेदखल करण्यात आली आहे. अकोल्यात दोन शाळांतील २ ते ३ किलोमीटरहून अधिक आहे़ इतक्या दूरवर मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी घेणार कोण, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. पाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव येथे उर्दू माध्यमाची शाळा आहे. त्यातील विद्यार्थ्यांचे समायोजन अन्य उर्दू शाळेत न करता मराठी शाळेत करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. संगमनेर तालुक्यातील निमोण, तर राहाता तालुक्यातील दाढ बु., येथील उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन मराठी शाळेत करा, असा शिक्षण विभागाचा आदेश आहे. कर्जत तालुक्यातील शिंदे वस्तीवरील सेमी इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन चापडगाव वस्तीवरील मराठी शाळेत करण्याच्या आदेशाने शिक्षक व पालकही अवाक् झाले आहेत.
अकोल्यात समायोजनाचा प्रश्न गंभीर
अकोले तालुक्यातील १४ शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करताना रस्ते, मूळ शाळा जास्तीचे अंतर, मुलांना शाळेत सोडविणे, यासारख्या अडचणी येत असून, या तालुक्यात शाळांचा प्रश्न गंभीर बनला आहे.