खरिपात घरातीलच बियाणे वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:19 AM2021-05-24T04:19:54+5:302021-05-24T04:19:54+5:30

चार तालुक्यात सोयाबीन पिकाची ५९ हजार हेक्टर क्षेत्रावर होणार यावर्षी पेरणी गणेश आहेर लोकमत न्यूज नेटवर्क लोणी : राहाता, ...

Use home grown seeds during kharif | खरिपात घरातीलच बियाणे वापरा

खरिपात घरातीलच बियाणे वापरा

चार तालुक्यात सोयाबीन पिकाची ५९ हजार हेक्टर क्षेत्रावर होणार यावर्षी पेरणी

गणेश आहेर

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी : राहाता, संगमनेर, कोपरगाव आणि अकोले या चार तालुक्यांत येत्या खरीप हंगामामध्ये ५९ हजार ४६४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित असून, या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी असलेले सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन संगमनेर विभागीय कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजारात सद्यस्थितीत सोयाबीनचे भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडे खरीप हंगामातील राखून ठेवलेल्या घरातीलच सोयाबीन बियाण्यांचा वापर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करावा, असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाचा फटका सर्वच व्यवसायांना बसल्याने महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल व प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित झालेले सोयाबीन यावर्षी पेरणीसाठी वापरू शकतात. प्रमाणित बियाण्याच्या उत्पादनातून प्रतवारी करून चांगल्या प्रतिच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. मात्र, हे करत असताना योग्य ती काळजी घ्यावी. कारण,सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते, त्याचे बाह्य आवरण पातळ असल्याने त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना शेतकऱ्यांनी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी मंडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती काळजी घ्यावी. बियाणाची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसल्याची खात्री करावी. तसेच दरवर्षी बियाणाची घरीच साठवणूक करताना प्लॅस्टिक पोत्यांचा वापर टाळावा, त्याऐवजी गोणपाटाची पोती वापरणे आवश्यक आहे. बियाण्याची साठवणूक करताना पोत्यांची थप्पी सात फुटांपेक्षा जास्त उंच राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.

.................

उगवण क्षमता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असावी....

घरातील बियाणे पेरणीसाठी वापरण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ते बियाणे पेरणीयोग्य असते. याशिवाय ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यास सोयाबीनची पेरणी करावी. पेरणी करताना दोन ते चार सेंटीमीटर खोलीपर्यंत बियाणे जाईल, याची काळजी घ्यावी. पेरणी अगोदर प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅमची दोनशे ते अडीचशे ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाणास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून ते सावलीत वाळवावे. नंतरच त्याची पेरणी करावी. बियाणे हाताळताना बियाण्याची जास्त आदळआपट न करता कृषी विभागाच्या मार्गदर्शनात आधुनिक पद्धतीने लागवड करावी.

-सुधाकर बोराळे, उपविभागिय कृषी अधिकारी, संगमनेर

.....................

अशी तपासावी उगवण क्षमता

ओलसर केलेल्या बारदान्यामध्ये साधारणपणे १०० सोयाबीनचे दाणे दहा ओळीत सारख्या अंतराने पसरावे. त्यानंतर हा ओला बारदान गुंडाळून ही गुंडाळी दोरीच्या साह्याने दोन्हीही बाजूला घट्ट बांधून झाडाखाली सावलीत ठेवावी. चार दिवस या गुंडाळून ठेवलेल्या बारदानावर दिवसातून तीन वेळा पाण्याच्या शिडकावा करावा. चार दिवसानंतर ही गुंडाळी सोडून १०० पैकी किती सोयाबीनचे दाणे अंकुरले आहे हे तपासावे. जेवढे सोयाबीनचे दाणे अंकुरले तेवढ्या प्रमाणात उगवण क्षमता ग्राह्य धरावी.

- नारायणराव लोळगे, कृषी पर्यवेक्षण अधिकारी, राहाता

..................

२०२०-२१ मधील प्रस्तावित सोयाबीन पेरणी क्षेत्र

राहाता तालुका : १६ हजार ५०१ हेक्टर

संगमनेर तालुका : ११ हजार १४७ हेक्टर

कोपरगाव तालुका : २१ हजार २५३ हेक्टर

अकोले तालुका : १० हजार ५६३ हेक्टर

Web Title: Use home grown seeds during kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.