कांदा व्यापाऱ्याची फसवणूक; एक कोटी ३३ लाख रुपयांना घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 04:50 PM2020-02-22T16:50:01+5:302020-02-22T18:48:20+5:30
उत्तर प्रदेशातील दोन व्यापा-यांनी संगमनेरातील एका व्यापा-याकडून कांदे खरेदी केले. मात्र, त्या दोघांनी एका बंद झालेल्या बँकेचा धनादेश देऊन तब्बल एक कोटी ३३ लाख ६६ हजार ८०३ रुपयांची संगमनेर येथील व्यापा-याची फसवणूक केली आहे.
संगमनेर : उत्तर प्रदेशातील दोन व्यापा-यांनी संगमनेरातील एका व्यापा-याकडून कांदे खरेदी केले. मात्र, त्या दोघांनी एका बंद झालेल्या बँकेचा धनादेश देऊन तब्बल एक कोटी ३३ लाख ६६ हजार ८०३ रुपयांची संगमनेर येथील व्यापा-याची फसवणूक केली आहे. हा प्रकार २५ जानेवारी ते ११ फेबु्रवारी २०२० दरम्यान घडला. याप्रकरणी शनिवारी (दि.२२)संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमन राजपूत व मनमोहन राजपूत (दोघेही राहणार, ललई, खैरगड, जि.फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापा-यांची नावे आहेत. याप्रकरणी मनोहर दगडू सातपुते (वय ३८, रा. खांजापूर, सुकेवाडी शिवार, ता.संगमनेर, जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर सातपुते हे संगमनेरातील कांद्याचे व्यापारी आहेत. अमन राजपूत व मनमोहन राजपूत या उत्तर प्रदेशातील दोन व्यापा-यांनी सातपुते यांच्याकडून कांदे खरेदी केले होते. हे कांदे त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी ट्रान्सपोर्टने पाठविण्यात आले होते. पाठविलेल्या कांद्याचे पैसे मिळण्यासाठी सातपुते यांनी अमन राजपूत व मनमोहन राजपूत यांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
पाठविलेल्या कांद्याची रक्कम एक कोटी ३३ लाख ६६ हजार ८०३ इतकी होती. या रक्क मेपोटी सातपुते यांना त्यांनी धनादेश दिला होता. सदर धनादेश बॅँक खात्यात भरण्यासाठी सातपुते गेले असता त्यांना तो बंद असलेल्या बॅँक खात्याच्या असल्याचे सांगण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी तपास करीत आहेत.
फोन बंद करुन ठेवले
संगमनेर येथील मनोहर सातपुते यांनी राजपूत यांना फोन केले असता त्यांचा फोन बंद होता. आपल्याकडून कांदे खरेदी करून त्याबदल्यात पैसे न देता फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर सातुपते यांनी वरील दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.