आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:21 AM2021-05-20T04:21:41+5:302021-05-20T04:21:41+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य ते नियोजन करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. शिर्डी शहरातही कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ...
जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य ते नियोजन करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. शिर्डी शहरातही कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शिर्डी नगरपंचायतीद्वारे विविध उपाययोजना सुरू आहेत. शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच आस्थापनांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. या ठिकाणी कर्मचारी कार्यरत आहेत. बँका, पतसंस्था, टेलिफोन, पोस्ट ऑफिस, वीज मंडळ या सार्वजनिक आस्थापनातील तसेच संस्थानातील रुग्णालय वगळता अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना अद्यापही कोविड लस देण्यात आलेली नाही. याशिवाय शहरातील पत्रकार, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, फळ विक्रेते यांनाही अद्याप लस देण्यात आलेली नाही. सदर ठिकाणी नागरिक मोठया प्रमाणावर एकत्रित येत असतात. त्यामधील एक जरी कर्मचारी अथवा भाजीपाला, किराणा दुकानदार बाधित असला तर मोठ्या प्रमाणावर संसर्ग होतो. याबाबीचा गंभीरपणे विचार करून वरील आस्थापना व अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना वयोमर्यादेची अट शिथिल करून प्राधान्याने कोविड लस देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.