कोरोना ड्युटी करणाऱ्या शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:21 AM2021-05-13T04:21:09+5:302021-05-13T04:21:09+5:30

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची भेट ...

Vaccinate teachers on corona duty with priority | कोरोना ड्युटी करणाऱ्या शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करा

कोरोना ड्युटी करणाऱ्या शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करा

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची भेट घेतली.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक कोरोनाशी संबंधित सर्व कामे करीत असून त्यांना लस घेण्यासाठी अनेक आरोग्य केंद्रांवर मज्जाव करण्यात येत असल्याची बाब शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्ह्यामध्ये शिक्षक घरोघरी जाऊन कोरोना बाधितांचा सर्वेक्षण करीत आहेत. कोविड सेंटरवर ड्युटी करीत आहेत, पोलिसांना सहकार्य करीत आहेत. मागील दीड महिन्यामध्ये ४० पेक्षा जास्त शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोना ड्युटी करणाऱ्या शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्याबाबत आरोग्य विभागाला सूचित करावे, अशी मागणी संघटनेने केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे संघटनेने म्हटले आहे.

याशिवाय जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेकांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध खात्यातील कर्मचारी सुद्धा यात बाधित होत आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व खात्यांच्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी सर्व कर्मचारी संघटनांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

यावेळी संघटनांच्या वतीने बापूसाहेब तांबे, राजू शिंदे, राजेंद्र निमसे, संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, मच्छिंद्र लोखंडे, विजय महामुनी, भाऊसाहेब नगरे, सुनील शिंदे, गौतम मिसाळ, सुभाष कराळे, विकास साळुंखे, एकनाथ ढाकणे, कुंडलिक भगत, एकनाथ राउत व इतर कर्मचारी संघटनांचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

------------

जे शिक्षक कोरोना ड्युटीसाठी आहेत, त्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्याबाबत सूचना देण्यात येतील. याशिवाय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याची मागणी कर्मचारी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सर्वांशी चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल.

- राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद

Web Title: Vaccinate teachers on corona duty with priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.